अपात्र सभासद पात्र करुन फ्लॅटच्या नावाने ६५ लाखांची फसवणुक

अजीत पवार यांच्या कार्यालयात कामाला असल्याची बतावणी करुन घातला गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२६
मुंबई, – अपात्र सभासद पात्र करुन ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात असलेल्या एसआरए प्रोजेक्टमधील इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून एका ठगाने बाराजणांना तब्बल ६५ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लतिफ शांतवन राजगुरु असे या ठगाचे नाव असून तो अनेकांना दिवंगत अजीत पवार यांच्या कार्यालयात कामाला असल्याचे सांगून मंत्रालयातून सर्व फाईल क्लिअर देतो असे संागत होता. आतापर्यंत बाराजणांना लतिफने ६५ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले असले तरी त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कांता नरेश मारु ही ४८ वर्षांची महिला ताडदेव येथे राहत असून जसलोक हॉस्पिटलमध्ये केअरटेकर म्हणून काम करते. तिला गुंतवणुक म्हणून एक फ्लॅट घ्यायचा होता. याच दरम्यान तिच्या एका परिचित इस्टेट एजंटने तिची ओळख लतिफ राजगुरुशी करुन दिली होती. त्याने तो दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजीत पवार यांच्या यांच्या कार्यालयात काम करत असल्याचे सांगितले. ताडदेवच्या तुळशीवाडी परिसरात काही एसआरए इमारतीचे प्रोजेक्ट असून अपात्र सभासदांना पात्र करुन, तिथे तिला स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. याकामासाठी त्याने तिच्याकडून ५५ हजार रुपये फी म्हणून घेतली होती.

२० डिसेंबर २०२५ रोजी ललिफ हा नवजीवन सोसायटी, गीता भवन येथे महाराष्ट्र शासन नाव असलेले एक ओळखपत्र घालून आला होता. त्याने तिला काही झोपड्याचे कागदपत्रे दाखवून मंत्रालयातून तिच्या नावाने एक पात्र झोपडीचे कागदपत्रे बनवून देतो असून तिला झोपडीची किंमत पंधरा रुपये असल्याचे सांगितले होते. त्याच्याकडे आतापर्यंत दोनशे अपात्र झोपड्यांची फाईल आली असून या सर्वांना पात्र करुन तो तुळसीवाडीतील एसआरए इमारतीमध्ये फ्लॅट देणार आहे असे सांगत होता. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्याला टप्याटप्याने २० लाख ६४ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्याने तिला लवकरच एसआरएचा फ्लॅटचे कागदपत्रे घेऊन भेटणार असल्याचे सांगितले. मात्र काही दिवस उलटूनही तो तिला भेटला नाही.

विचासरणा केल्यानंतर तो तिला काम अंतिम टप्यात सुरु आहे असे सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने मंत्रालयात जाऊन लतिफ राजगुरु नावाचा कोणी व्यक्ती अजीत पवार यांच्या कार्यालयात काम करतो का याबाबत विचारणा सुरु केली होती. यावेळी तिला असा कोणीही व्यक्ती तिथे काम नसल्याचे समजले. हा प्रकार समजताच तिने त्याच्याकडे एसआरए फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र तो तिला प्रतिसाद देत नव्हता, तिचे कॉल घेत नव्हता. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने तिच्यासह तिच्या नातेवाईकांना एसआरए फ्लॅटसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता. त्यापैकी हर्ष नरेश सगाठियाने दोन लाख पंचावन्न हजार, विमल मुकेफश मकवानाने एक लाख, राजेश जगदीश विंजुडाने सहा लाख रुपये लतिफला दिले होते.

या चौघांसह लतिफने अशाच प्रकारे सेहरअली सय्यदकडून दोन लाख, अकबर सलीम शेखकडून पाच लाख, साहिल अलीम शेखकडून तीन, मनेाज जगन्नाथ रणदिवेकडून साडेआठ लाख, जयाबेन आलजी सोलंकीकडून पावणेतीन लाख, वर्षा रमेश निर्मलकडून तीन, राकेश रमन सोलंकीकडून चार लाख असे सुमारे ६५ लाख रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही एसआरएचा फ्लॅट दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिले नव्हते. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत लतिफने अपात्र सभासद पात्र करुन बारा लोकांना एसआरए फ्लॅट देतो असे सांगनू त्यांची ६५ लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच कांता मारुसह इतर अकराजणांनी ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून तिने लतिफ राजगुरुविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसआरए फ्लॅटचे बोगस दस्तावेज दाखवून बाराजणांची ६५ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी लतिफविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो घाटकोपर येथे राहत असून या घटनेनंतर पळून गेला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page