अल्पवयीन मुलीवरील लैगिंक अत्याचाराने पायधुनीत तणाव
पोक्सोचा गुन्हा दाखल होताच आरोपी सुरक्षारक्षकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२६
मुंबई, – रविवारी सकाळी एका आठ वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित सुरक्षारक्षकाने लैगिंक अत्याचार केल्याने पायधुनी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी रस्त्यासह पोलीस ठाण्यात मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला आम्हीच शिक्षा करतो अशी जोरदार घोषणाबाजी केली होती. दरम्यान संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांची समजूत काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. अखेर आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला रात्री उशिरा पायधुनी पोलिसांनी अटक् केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी विशेष सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान या घटनेने परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
आठ वर्षांची पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत पायधुनी परिसरात राहते. याच परिसरातील एका इमारतीमध्ये आरोपी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. रविवारी सकाळी ती मुलगी इमारतीमधील वॉशरुमममध्ये गेली होती. या मुलीला वॉशरुममध्ये जाताना पाहिल्यानंतर आरोपी तिच्या मागे तिथे गेला होता. यावेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर मुलीकडून तिच्या पालकांना तसेच स्थानिक रहिवाशांना समजताच लोकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको आंदोल केले होते, त्यामुळे तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पिडीत मुलीला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची मेडीकल होणार आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली. या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करुन स्थानिक रहिवाशांनी नंतर पोलीस ठाण्यात मोर्चा काढला होता.
मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यांची समजूत काढली. त्याला कायद्याने शिक्षा होईल, कोणीही कायदा हातात घेऊ नये अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली होती. त्यानंतर ते सर्वजण तेथून निघून गेले होते. परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पायधुनी पोलिसांना आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने यापूर्वी काही अल्पवयीन मुलींवर गैरवर्तन केले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.