२८ वर्षांपासून डॉक्टर म्हणून बनाव करणार्या तोतयाचा पर्दाफाश
सीएसआर फंडाच्या नावाने दहा कोटीचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२६
मुंबई, – गेल्या २८ वर्षांपासून डॉक्टर म्हणून वावर करुन मुंबईसह विविध राज्यात मेडीकल कॅम्पच्या माध्यमातून सीएसआर फंडाच्या नावाने कोट्यवधी रुपये जमा करुन पैशांचा अपहार करणार्या एका तोतया डॉक्टरचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. धर्मेद्र कुमार असे या तोतया डॉक्टरचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने गुरुवार १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सीआरए फंडाच्या नावाने त्याने आतापर्यंत दहा कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले.
धर्मेद्र कुमार हा जुहू परिसरात राहत असून तो अनेकांना डॉक्टर असल्याचे सांगत होता. त्याने स्वतची ३६५ नावाची एका सामाजिक संस्था सुरु केली होती. त्यासाठीत त्याने बोगस ओळखपत्राच्या मदतीने विविध बँकेत खाती उघडले होते. या संस्थेमार्फत त्याने मुंबईसह विविध राज्यात मेडीकल कॅम्प आयोजित केली होती. या कॅम्पच्या माध्यमातून त्याने विविध रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्याच्या या आवाहनानंतर त्याच्या संस्थेने अनेकांनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती. ही रक्कम त्याने उघडलेल्या विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली जात होती. गेल्या तीन वर्षांत त्याच्या विविध बँक खात्यात सुमारे दहा कोटी रुपये जमा झाले होते. या पैशांचा रुग्णाच्या उपचारासाठी वापर न करता त्याने संबंधित पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी परस्पर वापर करुन फसवणुक केली होती.
याबाबतची माहिती अलीकडेच गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या अधिकार्यांना प्राप्त झाली होती. या माहितीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी गंभीर दखल घेत युनिटचे एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक् अरविंद पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सलमान खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक शेडगे, पोलीस हवालदार सानप, चव्हाण, पोवळकर, पोलीस शिपाई नारायण चव्हाण, सालके, जुहू पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई करीना म्हात्रे, कविता केंद्रे यांनी तपास सुरु केला होता.
शनिवारी रात्री उशिरा या पथकाने धर्मेंद्र कुमार याच्या जुहू येथील मालकी हक्काच्या फ्लॅटमध्ये अचानक छापा टाकला होता. त्यात या अधिकार्यांना विविध राज्यातील व्यक्तींचे, कंपन्यांचे नाव, प्रोजेक्ट रिपोर्ट सापडले. तसेच धर्मेद्र कुमार नावाचे बोगस डॉक्टर असल्याचे ओळखपत्र, पॅनकार्ड, व्हिझीटिंग कार्ड, विविध संस्थांनी दिलेले प्रमाणपत्र, औषधोपचाराचे साहित्य आदी मुद्देमाल जप्त केला आहे. त्याने बोगस कागदपत्रांच्या आधारे विविध बँकेत खाती उघडल्याचे तसेच त्या बँक खात्यात गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले होते. प्राथमिक तपासात त्याने आतापर्यंत सीएसआर फंडाच्या माध्यमातून दहा कोटीच्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याचा वैद्यकीय क्षेत्राशी काहीही संंबंध नसून तो डॉक्टर नाही. तरीही तो अनेकांना गेल्या २८ वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे तसेच गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देत असल्याचे सांगत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता, वैद्यकीय व्यवसाय अधिनियम आणि राष्ट्रीय चिकित्सा आयोग अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर युनिट एककडे वर्ग करण्यात आला. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.
अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीचे सदस्य इतर काही राज्यात वास्तव्यास आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात त्याच्या काही सहकार्यांचे नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.