फ्लॅट विक्रीसाठी बोगस दस्तावेज बनविणार्‍या आरोपीस अटक

तक्रारदार महिलेच्या पतीला मदत करुन आर्थिक मोबदला घेतला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२६
मुंबई, – फ्लॅट विक्रीसाठी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी शितल बन्सीधर भंडारकर नावाच्या एका महिलेस अंधेरी पोलिसांनी अटक केली. तक्रारदार महिलेच्या पतीला बोगस दस्तावेज बनविण्यास मदत करुन तिने त्याच्याकडून आर्थिक मोबदला घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर शितलला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत तपस चंपकलाल मेहता हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आशा तपस मेहता ही महिला अंधेरीतील ओल्ड पोलीस लाईन, लाभ-आशिष अपार्टमेंटमध्ये राहते. २००४ साली तिचे तपस मेहताशी लग्न झाले असून त्यांना एक २० वर्षांचा मुलगा आहे. तो कर्नाटक येथे शिक्षणासाठी गेला होता. २०२१ पासून आशा आणि तपस यांच्यात वैचारिक मतभेद होते. त्यामुळे एकाच फ्लॅटमध्ये राहूनही ते वेगवेगळ्या रुममध्ये राहत होते. गेल्या दहा वर्षांपासून तपस त्यांच्या मालकीचा फ्लॅट विक्रीसाठी प्रयत्न करत होते. मात्र फ्लॅट विक्रीला आशा हिचा विरोध होता. याच दरम्यान त्याने फ्लॅटचे पॉवर ऑफ ऍटर्नी बनविली होती. त्यात ती फ्लॅटची काळजी घेण्यास असमर्थ असल्याने त्याचे पूर्ण हक्क तपस मेहता याला देत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याची तिची बोगस स्वाक्षरी आणि फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर फ्लॅटची पाहणी करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना तो घरी घेऊन येत होता.

नोव्हेंबर २०२५ रोजी तिला तिच्या मालकीचा फ्लॅट तपसने परस्पर तेजलबेन किशनकुमार राणा आणि किशनकुमार अशोकभाई राणा यांना विक्री केला आहे. या फ्लॅटवर त्यांनी एका बँकेतून ५० लाखांचे गृहकर्ज घेतले होते. ही रक्कम नंतर त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. त्यासाठी त्याने तिचे बोगस पॉवर ऑफ ऍटर्नी, सोसायटीचे एनओसी प्राप्त करुन त्यात सेक्रेटरीची बोगस स्वाक्षरी केली होती. या बोगस दस्तावेजासाठी त्याला शितल भंडारकर या महिलेने मदत केली होती. या दोघांनी संगनमत करुन तिच्या नावाने बोगस पॉवर ऑफ ऍटनी बनवून, सोसायटीच्या सेक्रेटरीचे बोगस स्वाक्षरी करुन एनओसी प्राप्त करुन राणा कुटुंबियांना दिले होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्यांनी बँकेत गृहकर्जासाठी अर्ज केला आणि त्यांना नंतर बँकेकडून ५० लाखांचे कर्ज प्राप्त झाले होते.

गृहकर्जाची ही रक्कम तपस मेहताने स्वतच्या बँक खात्यात जमा करुन तिच्यासह राणा कुटुंबियांची, बँकेची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने नोव्हेंबर २०२५ रोजी तिचा पती तपस मेहता आणि बोगस दस्तावेज बनविण्यासाठी मदत करणार्‍या शीतल भंडाकर यांच्याविरुद्ध अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत गेल्या आठ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या शितल भंडारकरला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिला बोगस दस्तावेज बनविण्यासाठी आणखीन कोणी मदत केली होती का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page