घरकाम करताना हातसफाई करणार्‍या दोन महिलांना अटक

बांगुरनगर-चारकोप पोलिसांची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – घरकाम करताना हातसफाई करणार्‍या दोन मोलकरीण आरोपी महिलांना बांगुरनगर आणि चारकोप पोलिसांनी अटक केली. निला बाबासाहेब दांगट आणि किरण राजू तुषाबंड अशी या दोघींची नावे असून अटकेनंतर या दोघींनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

ज्योती राजेश भोजवानी ही ४७ वर्षांची महिला गोरेगाव येथे राहत असून त्यांच्या कुटुंबियांचा भोज मसाले नावाच्या मसाल्याचा व्यवसाय आहे. पूर्वी तिच्याकडे किरण ही अधूनमधून घरकामासाठी येत होती. तिचे काम आवडल्याने तिने तिला एप्रिल २०२६ पासून घरकामासाठी ठेवले होते. ८ जूनला तिने कपाटातील काही दागिन्यांची पाहणी केली होती, त्यात तिला विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असे सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल दिसून आला नाही. त्यामुळे तिने किरणकडे चौकशी केली होती. तिने कपाटातून पैसे चोरी केल्याची कबुली दिली, मात्र दागिने चोरी केले नसल्याचे सांगितले. या प्रकारानंतर तिने किरणविरुद्ध बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत किरण तुषाबंड हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला बुधवारी पोलिसांनी अटक केली.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. तिचे पती एका खाजगी शाळेचे ट्रस्टी तर ती स्वत शाळेत मुख्याधापिका म्हणून काम करते. तिच्याच घरी निला ही घरकाम करत होती. सकाळी कामावर आल्यानंतर ती दुपारी तीन वाजता तिच्या घरी जात होती. ३ जानेवारीला तिने एका ज्वेलर्स दुकानातून दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन घेतले होते. ते कॉईन तिने एका पर्समधून ठेवून ती पर्स कपाटात ठेवली होती. १६ जानेवारीला तिने कपाटातून पर्स काढून सोन्याचे कॉईन काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला ते कॉईन आणि पैसे चोरीस गेल्याचे दिसून आले.

तिने कपाटात सर्वत्र कॉईनचा शोध घेतला, मात्र तिला ते कॉईन सापडले नाही. तिच्या घरी निलाशिवाय कोणीही येत नव्हते. त्यामुळे तिने सोन्याचे कॉईन आणि पैसे चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने तिच्याविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर निलाविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पाच महिन्यानंतर निलाला चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोन्ही महिलांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page