ड्रग्ज तस्करीप्रकरणी महिलेसह विदेशी नागरिकाला अटक

१३ कोटी ८५ लाखांचा कोकेन-हायड्रोपोनिक गांजा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत एका महिलेसह विदेशी नागरिकाला वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेल आणि हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हर्षा सनी आणि एजे सॅम्युअल नवेज अशी या दोघांची नावे आहेत. या दोन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी १३ कोटी ८५ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा आणि कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले असता हर्षाला न्यायालयीन तर एजे नवेजला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हर्षा ही काही दिवसांपूर्वीच पर्यटन आणि नेल आर्ट मॉडलिंग क्षेत्रातील संधी शोधण्यासाठी बँकॉंकला गेली होती. तिथेच प्रवासादरम्यान एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने तिला एक बॅग दिली होती, ही बॅग तिला त्याच्या मित्राला देण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी ती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. यावेळी तिला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या बॅगेच्या झडतीत या अधिकार्‍यांना बारा पॅकेट सापडले.

या पॅकेटमध्ये ११ किलो ८२४ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजा होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ११ कोटी ८२ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. हा गांजा जप्त केल्यानंतर तिच्याविरुद्ध या अधिकार्‍यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हर्षा ही सुनियोजित हायड्रोपोनिक गांजा तस्करी करणार्‍या नेटवर्कची बळी ठरल्याचे बोलले जाते.

दुसर्‍या कारवाईत वरळी युनिटच्या अधिकार्‍यांनी कोकेन विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली. एजे नवेज असे या नायजेरीयन नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी २०३ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोन कोटी तीन लाख रुपये इतकी आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी जास्तीत जास्त गस्त आणि नाकाबंदीवर भर टाकला होता.

गुरुवारी रात्री उशिरा वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत घोगरे, पोलीस हवालदार राजदीप दळवी, नितीन जाधव, ज्ञानेश्‍वर इघे, चव्हाण, हणमंत येडगे, महिला पोलीस हवालदार टेकाळे आदी परिसरात गस्त घालत होते. रात्री दोन वाजता या पथकाला वरळीतील सुदाम काळू अहिरे मार्ग, दूरदर्शन केंद्राजवळ एक नायजेरीयन नागरिक संशयास्पद फिरताना दिसला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्यात या अधिकार्‍यांनी सुमारे दोन कोटीचे २०३ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले.

चौकशीत त्याचे नाव एजे नवेज असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा नायजेरीयाच्या इबोनी, इबुरुचा रहिवाशी असून सध्या नालासोपारा येथील प्रगतीनगरात राहतो. चौकशीत त्याने ते कोकेन त्याच्या ग्राहकाला विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page