मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत तीन अल्पवयीन मुलींचा त्यांच्याच परिचिताने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना अंधेरी, घाटकोपर आणि भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबोली, घाटकोपर आणि भांडुप पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले आहे.
४१ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील आंबोली परिसरात राहते. बळीत नऊ वर्षांची बळीत तिची मुलगी आहे. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता ही मुलगी सोसायटीच्या आवारात खेळण्यासाठी गेली होती. काही वेळानंतर ती घरी जात होती. यावेळी सोसायटीचा २६ वर्षांचा सुरक्षारक्षक तिथे आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार तिच्याकडून तिच्या आईला समजताच तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार आंबोली पोलिसांना सांगून आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा उत्तरप्रदेशच्या सांगीपूर, लालगंजचा रहिवाशी असून काही महिन्यांपासून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.
दुसरी घटना भांडुप परिसरात घडली. बळीत मुलगी अकरा वर्षाची असून तिच्या पालकासोबत भांडुप येथे राहते. तिच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ट्यूशन चालत असून तिथेच ती शिकवणीसाठी जाते. बुधवारी दुपारी पाऊणच्या सुमारास ती ट्यूशनवरुन लिफ्टने तिच्या घरी जात होती. यावेळी लिफ्ट असलेल्या तिच्या परिचित ५३ वर्षांच्या आरोपीने जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न केला. तिला स्वतजवळ ओढून त्याने तिच्या छातीसह अन्य ठिकाणी नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. बळीत आणि आरोपी एकाच इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिसर्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत एका अल्पवयीन मुलासह तिघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. १३ वर्षांची बळीत मुलगी घाटकोपर येथे राहत असून घरापासून काही अंतरावर तिचे क्लास आहे. याच परिसरात तिन्ही आरोपी राहत असून ते तिघेही अनेकदा क्लासला जाताना तिला पाहून अश्लील संभाषण करत होते. मात्र ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती. मंगळवारी २४ डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता ती तिच्या घरी होती. यावेळी तिच्या घरी एक आरोपी आला आणि त्याने दरवाजाची कडी आतून लावून लाईट बंद केली होती. त्यानंतर त्याने तिच्या छातीसह कमरेला अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिचे टॉप काढून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळानंतर तो तेथून पळून गेला होता. या घटनेनंतर तिने तिन्ही आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली तर चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाल नोटीस देऊन सोडून दिले होते.