मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – जेद्दामार्गे नार्वेला जाण्यासाठी आलेल्या एका पती-पत्नीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. सुब्रतो कालिपडा मंडल आणि मिता गौरापाडा बिश्वास अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना युरोप देशात कायमचे स्थायिक व्हायचे होते, त्यासाठी त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनवून भारतीय पासपोर्ट मिळविले होते. मात्र तिथे जाण्यापूर्वी या दोघांनाही इमिग्रेशन अधिकार्यांनी अटक केली. त्यामुळे युरोपमध्ये स्थायिक होण्याची त्यांची योजना फसली गेली आहे.
उमेश दत्तात्रय निंबाळकर हे नाहूर येथे राहत असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करतात. शनिवारी 31 मेला ते रात्रपाळी कर्तव्यावर हजर झाले होते. काऊंटर 39 वर काम करताना ते विदेशात जाणार्या प्रवाशांच्या इमिग्रेशनची तपासणी करत होते. रात्री साडेबारा वाजता तिथे सुब्रतो आणि मिता हे दोघेही आले होते. ते दोघेही जेद्दामार्गे नार्वे येथे जाणार होते. यावेळी त्यांच्यासोत एक लहान मुलगा होता. या दोघांबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान या दोघांनी ते बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली होती.
पाच वर्षांपूर्वी बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून ते दोघेही भारतात पळून आले होते. कोलकाता येथे वास्तव्यास असताना त्यांनी एका एजंटच्या मदतीने भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविले होते. या दस्तावेजाच्या मदतीने त्यांनी गेल्या वर्षी कोलकाता येथील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज केला होता. याच पासपोर्टवर त्यांना युरोप देशात कायमचे स्थायिक व्हायचे होते. त्यासाठी त्यांना एका एजंटने मदत केली होती. त्याने त्यांच्याकडून तिथे नोकरीसह व्हिसा व स्थायिक होण्यासाठी पैसे घेतले होते. व्हिसा मिळताच ते दोघेही युरोपला जाण्यासाठी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते,
मात्र या दोघांनाही इमिग्रेशन अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि हा प्रकार उघडकीस आला. या दोघांनाही नंतर सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी उमेश निंबाळकर यांच्या तक्रारीवरुन सुब्रतो मंडल आणि मिता बिश्वास यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेजाच्या मदतीने भारतीय पासपोर्ट मिळविणे आणि याच पासपोर्टवर विदेशात प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोघांनाही नंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.