शेअर गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देण्याच्या आमिषाने गंडा

खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका पिता-पूत्राची सुमारे दहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी निनाद कदम, रिद्धी शहा व इतर आरोपींविरुद्ध कांदिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या टोळीने शेअर गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी कांदिवली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आशिष नवनीतलाल पारिख हे कांदिवलीतील रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मार्च महिन्यांत त्यांना सोशल मिडीयावर ब्लिंकएक्सप्रो कंपनीची एक जाहिरात दिसली होती. या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी जाहिरातीवर दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी निनाद कदमने त्यांना त्याच्या कंपनीच्या आकर्षक योजनेची माहिती सांगितली होती. त्यातील एका शेअर योजनेत गुंतवणुक केल्यास त्यांना दुप्पट रक्कम मिळेल असे सांगण्यात आले होते. ही कंपनीत शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करत असून त्यातून त्यांच्या सभासदांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या कंपनीत अनेकांनी गुंतवणुक केली असून त्या सर्वांना चांगला फायदा झाला आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

याच दरम्यान त्यांना निनादने रिद्धी शहाशी ओळख करुन देताना तिच्याशी सविस्तर चर्चा करुन गुंतवणुक करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून आशिष पारिख यांच्यासह त्यांच्या मुलीने विविध शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता. त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली नाही. याबाबत निनादसह रिद्धीशी संपर्क साधला असात त्यांनी त्यांना सर्व्हिस चार्जेस भरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी सुमारे चार लाखांचा सर्व्हिस चार्ज भरला होता. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही त्यांना त्यांची गुंतवणुकीसह व्याजाची रक्कम मिळाली नाही.

शेअर गुंतवणुकीवर दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून या आरोपींनी त्यांच्यासह त्यांच्या मुलीला सुमारे दहा लाख रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच आशिष पारिख यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी निनाद कदम, रिद्धी शहा व इतर आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून या टोळीने शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page