जुन्या वादातून 45 वर्षांच्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला

रेकॉर्डवरील दोन्ही मारेकर्‍याना अटक व पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – जुन्या वादातून कुमार देवेंद्र या 45 वर्षांच्या व्यक्तीवर त्यांच्याच परिचित दोघांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कुमार देवेंद्र हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून वडाळा टी टी पोलिसांनी दोन्ही रेकॉर्डवरील मारेकर्‍यांना अटक केली आहे. मुझफ्फर कोकण सरदार ऊर्फ चोर बटला आणि विशाल दिपक पवार ऊर्फ बासी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना रविवारी सकाळी साडेपाच वाजता सायन-कोळीवाडा येथील कोकरी आगार, म्हाडा चाळीतील सार्वजनिक बाथरुमसमोरील मच्छी मार्केटसमोर घडली. याच परिसरात लक्ष्मी देवेंद्र ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून कुमार देवेंद्र हा तिचा पती आहे. दोन्ही आरोपी याच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.

रविवारी सकाळी साडेपाच वाजता जुन्या वादातून कुमार देवेंद्र याच्यावर मुझफ्फर आणि विशाल यांनी तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात कुमार देवेंद्र हा गंभीरररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी लक्ष्मी देवेंद्रच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मुझफ्फर सरदार आणि विशाल पवार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

तपासात ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मुझफ्फरविरुद्ध पंचवीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून मार्च 2022 साली त्याच्यावर तडीपारची कारवाई झाली होती. विशालविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद असून त्याच्याविरुद्ध चॅप्टर केसमध्ये बंधपत्र घेण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page