मद्यप्राशन करुन हुज्जत घालून पोलीस हवालदाराला मारहाण

गुन्हा दाखल होताच सातही मद्यपी आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – मद्यप्राशन करण्यासाठी बारसमोर धिंगाणा घालणार्‍या सातजणांच्या टोळीने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस हवालदाराशी हुज्जत घालून मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सातही मद्यपी आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. योगेश बाबासाहेब चव्हाण, अक्षय अरुण कातुरडे, सुशील विजय दळवी, दिपेश परब, समीर संजय राणे, रोशन मधुकर गायकर आणि सुजीत संजय मांजरेकर अशी या सातजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना सोमवारी रात्री उशिरा दोन वाजता अंधेरीतील सहार रोड, मयुरी बारसमोर घडली. भास्कर भीमराव गायकवाड हे नवीन माटुंगा पोलीस लाईन वसाहतीत राहत असून सध्या अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते रात्रपाळी कर्तव्यावर हजर झाले होते. यावेळी वरिष्ठांच्या आदेशावरुन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारची तपासणी करत होते. रात्री दिड वाजता ते त्यांच्या सहकार्‍यासोबत अंधेरीतील सहार रोड, मयुरी बारमध्ये गेले होते. बार बंद असल्याने संबंधित पोलीस पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री दोन वाजता मयुरी बारचे कर्मचारी धर्मेंद्र ओमकार सिंग यांनी पोलिसांना कॉल करुन सातजण बार सुरु करण्यावरुन त्यांच्याशी वाद घालत असल्याचे सांगितले होते.

संबंधित व्यक्ती तिथे प्रचंड धिंगाणा घालून शिवीगाळ करत होते. त्यामुळे पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी पोलिसांनी धिंगाणा घालणार्‍या सातही व्यक्तींना तेथून जाण्यास सांगितले. यावेळी त्यापैकी एका व्यक्तीने त्यांनाच शिवीगाळ करुन त्यांचे ओळखपत्र खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांना जोरात लाथ मारली होती. तसेच इतरांनी त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. हा प्रकार समजताच तिथे अंधेरी पोलीस ठाण्याचे इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आले होते. पोलिसांना पाहताच तीनजण पळून गेले तर पळून जाणार्‍या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या चौघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या इतर तीन पळून गेलेल्या सहकार्‍यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीदरम्यान त्यांची नावे योगेश चव्हाण, अक्षय कातुरडे, सुशील दळवी, दिपेश परब, समीर राणे, रोशन गायकर, सुजीत मांजरेकर असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण अंधेरी आणि विलेपार्ले येथील रहिवाशी आहे. या चौघांनी मद्यप्राशन केले होते. त्यांना आणखीन मद्यप्राशन करायचे होते. त्यामुळे त्यांनी बंद झालेले मयुरी बार पुन्हा करण्यासाठी बारच्या कर्मचार्‍यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन पोलीस हवालदार भास्कर गायवाकड यांना मारहाण केली होती. त्यामुळे या सातही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदीसह भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या सर्वांना मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page