स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने गंडा घालणार्‍या त्रिकुटास अटक

व्यवहार सुरु असताना पोलीस कारवाईची बतावणी करुन पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – विदेशात आणलेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तीनजणांच्या टोळीने फसवणुक करुन पलायन केले, याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना बीकेसी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद मोहसीन अबुबिलाल चौधरी, तबरेज युनूस कुरेशी आणि प्रदीप दादाराम थोरात अशी या तिघांची नावे असून ते तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह पडघा, गुजरात राज्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. व्यवहार सुरु असताना पोलीस कारवाई झाल्याची बतावणी करुन ही टोळी पैसे घेऊन सोने न देता पलायन करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

इरफान लालसाब पटेल हा बदलापूरला राहत असून त्याचा टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. फेब्रुवारी महिन्यांत सोशल मिडीयावरुन त्याची डॉ. नितेश बंसल नाव सांगणार्‍या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने त्याला तो विदेशातून सोने आणून भारतात स्वस्तात सोन्याची विक्री करत असल्याचे सांगितले होते. त्याने त्याला स्वस्तात सोने देतो असे सांगून त्याचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्याने त्याच्याकडून सोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने त्याला कॅश घेऊन सांताक्रुज येथील सीएसटी रोड, बीएमडब्ल्यू शोरुमजवळ बोलाविले होते. तिथे आल्यानंतर त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्‍याने त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते.

याच दरम्यान तिथे एका कारमधून काहीजण आले. त्यांनी त्याच्यासह त्याच्या मित्राला कारमधून बसून घेऊन गेले. काही वेळानंतर त्याला तिथे पोलिसांची कारवाई झाली असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी चौकशीसाठी नेल्याचे सांगितले. त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्याला दोन लाख रुपये आणून देतो असे सांगितले, मात्र बराच वेळ होऊन तो परत आला नाही. त्यामुळे तो बदलापूरला निघून गेला. काही दिवसांपासून तो त्याला सोने किंवा पैसे देतो असे सांगत होता, मात्र त्याने त्याला पैसे किंवा सोने दिले नाही.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद मोहसीन चौधरी, तबरेज कुरेशी आणि प्रदीप थोरात या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद मोहसीनविरुद्ध बीकेसी, घाटकोपर, नवघर पोलीस ठाण्यात तीन, तबरेजविरुद्ध बीकेसी, नवघर, वाडज (गुजरात) पोलीस ठाण्यात चार तर प्रदीपविरुद्ध बीकेसी, पडघा पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीच्या चार गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page