पंधरा वर्षांच्या दोन मुलांना ब्लॅकमेल करुन खंडणी वसुली

खंडणीच्या गुन्ह्यांतील दोन्ही आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सिगारेट पित असल्याचे फोटो पाठवून नारकोटीक्स विभागात तक्रार करण्याची धमकी देऊन पंधरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना खंडणीसाठी धमकावून त्यांच्याकडून सुमारे पाच लााखांची कॅश आणि दागिने स्वरुपात खंडणी वसुली करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. साहिल अमीत नायक आणि अनिरुद्ध अनिलकुमार पाठक ऊर्फ आदित्य अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घरातील दागिने चोरीस जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोन्ही मुलांना घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर हा संपूर्ण प्रकरण उजेडात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

45 वर्षांचे तक्रारदार बोरिवली परिसरात त्यांची वयोवृद्ध आई, पत्नी आणि पंधरा वर्षांच्या मुलासोबत राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर त्यांची पत्नी स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करते. याच सोसायटीमध्ये त्यांचे मित्र त्यांच्या पत्नी आणि पंधरा वर्षांच्या मुलासोबत राहतात. त्यांचा मुलगा आणि मित्राचा मुलगा एकाच वयाचे असल्याने ते दोघेही चांगले मित्र आहेत. 6 ऑक्टोंबरला त्यांचा मित्र त्याच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी आला होता. त्यांनी त्यांच्या मुलाने त्यांच्या मुलासह घरातून काही दागिने घेतले असून ते दोघेही कोणाला तरी दिल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तक्रारदाराने त्यांच्या मुलासह मित्राच्या मुलाकडे आपुलकीने चौकशी केली होती.

यावेळी या दोघांनी घरातील 55 ग्रॅम वजनाचे 4 लाख 80 हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि 23 हजाराची कॅश असा पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन तो मुद्देमाल साहिल आणि अनिरुद्ध या दोघांना दिल्याची कबुली दिली. मे 2025 रोजी ते दोघेही बोरिवलीतील आयसी कॉलनी, सिल्व्हर कॉईन हॉटेलसमोर फुटबॉल खेळण्यासाठी गेले होते. तिथे काही तरुण सिगारेट पित बसले होते. त्यात साहिल आणि अनिरुद्ध या दोघांचा समावेश होता. दुसर्‍या दिवशी या दोघांनी तिथे सिगारेट पित असलेल्या काही मुलांचे फोटो काढले होते. हा फोटो नारकोटीक्स विभागाला देऊन संबंधित मुलांविरुद्ध तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलांवर कारवाई होणार आणि त्यांना अटक केली जाईल अशी भीती दाखविली होती.

प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी त्यांच्या घरी कॅश आणि दागिन्यांची चोरी करुन तो मुद्देमाल दोन्ही आरोपींना दिला होता. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर तक्रारदारासह त्यांच्या मित्राला धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी साहिल आणि अनिरुद्धला कॉल करुन त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या दोघांनी त्यांना कारवाईची धमकी देऊन दोन्ही मुलांकडून कॅश आणि दागिन्यांच्या स्वरुपात खंडणी वसुली केल्याची कबुली दिली. तसेच ते दागिने त्यांना परत करतो असे सांगून पोलिसांत तक्रार करु नका अशी विनंती केली होती. प्रकरण गंभीर असल्याने तक्रारदारांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत साहिल नायक आणि अनिरुद्ध पाठक यांच्याविरुद्ध कारवाईची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे, खंडणीसाठी धमकी देऊन कॅश आणि दागिने स्वरुपात खंडणी वसुली करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही बोरिवली परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page