मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 नोव्हेंबर 2025
मुंबई, – क्षुल्लक वादातून एका मित्राने मिठी नदीत उडी घेतल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी दुसर्यानेही मिठी नदीत उडी घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. इर्शाद आसिफ शेख आणि कलंदर अल्ताफ खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वांद्रे येथील रहिवाशी आहेत. या दोघांचा शोध सुरु असून माहीम पोलिसांसह बचाव पथकाने शोधमेाहीम हाती घेतल्याचे सांगण्यात आले.
ही घटना मंगळवारी दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या दरम्यान माहीम आणि वांद्रे येथील खाडीच्या पुलावर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. इर्शाद शेख आणि कलंदर खान हे दोघेही वांद्रे येथील नर्गिस दत्त नगर, लालमिट्ठी परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात चांगली मैत्री होती. मंगळवारी दुपारी या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात इर्शादने पाण्यात उडी घेतली होती.
हा प्रकार कलंदरच्या लक्षात येताच त्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती. त्यांना पोहता येत नव्हते, त्यामुळे ते दोघेही बुडाले होते. ही माहिती प्राप्त होताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. माहीम पोलिसांसह बचाव पथकाने या दोघांचा शोध सुरु केला होता. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरु होती, मात्र ते दोघेही सापडले नाही. याप्रकरणी माहीम पोलिसांनी दोन मुले पाण्यात बुडाल्याची नोंद करुन तपास सुरु केला आहे.