भरस्त्यात सात शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंग
विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जानेवारी 2026
मुंबई, – गाडीत फिरवून आणतो असे सांगून भरस्त्यात चौदा ते पंधरा वयोगटातील सात शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करुन एका 36 वर्षांच्या आरोपीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
14 वर्षांची बळीत मुलगी तिच्या पालकांसोबत सांताक्रुज परिसरात राहते. सध्या ती मालवणीतील एका शाळेत शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ती नेहमीप्रमाणे शाळेसाठी घरातून निघाली होती. शाळा परिसरात ती तिच्या काही सहकारी मैत्रिणीसोबत असताना तिथे एक व्यक्ती आला. काही कळण्यापूर्वीच त्याने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन मिठी मारली, त्यांच्याशी अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केला होता. त्यांना दररोज तिथे भेटण्यास सांगून त्यांना गाडीतून फिरवून आणतो असे सांगू लागला. अचानक घडलेल्या या प्रकाराने या सर्व मुली प्रचंड घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर तिथे काही लोक जमा झाले होते.
ही माहिती प्राप्त होताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बळीत मुलीच्या आईकडून घडलेला प्रकार समजल्यानंतर मालवणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन दुपारी या गुन्ह्यांत अटक केली होती. अटकेनंतर बुधवारी दुपारी त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भरस्त्यात एकाच वेळेस सातही मुलीशी अश्लील चाळे करुन विनयभंगाच्या प्रकाराने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.