मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 फेब्रुवारी 2026
मुंब्रा, – अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराची पतीने बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना मुंब्रा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद आबिद अब्दुल वाजिद मलिक असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्यानेच त्याची पत्नी फरहीनला राज ललन यादव याला शीतपेयातून सोडियम नायट्रेड पावडर पिण्यास प्रवृत्त करुन नंतर त्याची बांबूने मारहाण करुन हत्या केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी 17 फेब्रुवारला रात्री एक ते दोनच्या सुमारास मुंब्रा येथील साहारा सिटीजवळील ए विंगमधील मोकळ्या चालू असलेल्या ठिकाणाच्या तिसर्या मजल्यावर घडली. मोहम्म्द आबिद हा उत्तरप्रदेशच्या बिजनौर, फुलसंद नेहतोरचा रहिवाशी आहे. सध्या तो त्याच्या पत्नी फरहीनसोबत साहारा सिटीजवळील स्टार सिटी अपार्टमेंटमध्ये राहत होता. मृत राजू यादव हा त्यांच्या परिचित असून ते एकमेकांना ओळखतात. राजू याचे फरहीनसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. ही माहिती अलीकडेच मोहम्मद आबिदला समजली होती. याच कारणावरुन त्याचे त्याच्या पत्नीसोबत वाद होत होते. याच वादातून त्याने राजूची हत्येची योजना बनविली होती.
ठरल्याप्रमाणे त्याने सोशल मिडीयावर एक स्टोरी पाहून ऑनलाईन सोडियम नायट्रेड पावडर मागविले होते. ती पावडर त्याने शीतपेयातून मिसळून त्याच्या पत्नी फरहीन हिला राजू यादवला देण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने शीतपेय राजूला पिण्यास प्रवृत्त केले होते. या घटनेनंतर मोहम्मद आबिदने राजूला बांबूने बेदम मारहाण केली होती. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजू हा रक्तबंबाळ झाला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या राजूला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक नितीन पगार, शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक माने, अजय गंगावणे व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.
स्थानिक रहिवाशांसह राजू याच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीत राजू याचे फरहीनसोबत गेल्या आठ महिन्यांपासून अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले होते. ही माहिती उघडकीस येताच पोलिसांनी मोहम्मद आबिदच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्यानेच राजूची पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून रागाच्या भरात बांबूने बेदम मारहाण केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याची फरहीन हिचा सहभाग उघडकीस आल्यानंतर तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तिचीही पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.