ऑनलाईन फसवणुकीसाठी मित्राच्या दोन बँक खात्याचा गैरवापर
दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2026
मुंबई, – नोकरीचे आमिष दाखवून एका 28 वर्षांच्या तरुणाच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करुन त्याच्याच दोन मित्रांनी दोन्ही बँक खात्याचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार मालाडच्या मालवणी उजेडात आला आहे. याप्रकरणी रेहान जाफर शेख आणि फैजान फरीद मणियार या दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध मालवणी पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराच्या बँक खात्याचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बँकेने खात्यातील सर्व व्यवहार बंद केल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पोली शोध घेत आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
अझरुद्दीन फारुख मलकानी हा तरुण मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. मार्च 2025 रोजी त्याच्याकडे काहीच काम नव्हते, त्यामुळे तो नोकरीच्या शोधात होते. याच दरम्यान त्याला त्याचे दोन मित्र रेहान आणि फैजान यांनी त्याचे बँक खात्याविषयी विचारणा केली होती. ते दोघेही त्याच परिसरात राहत असून गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांनी त्याला त्याच्या बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले होते. या बँक खात्याच्या मोबदल्यात त्यांनी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्याकडे काहीच काम नव्हते, बँक खात्याची माहिती दिल्यास त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती, त्यामुळे त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना त्याच्या बँक खात्याची डिटेल दिली होती.
काही दिवसांनी त्याला त्याच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर होत असल्याचे दिसून आले. त्यातून ते दोघेही त्याला ठराविक रक्कम वेतन म्हणून देत होते. काही दिवसांनी त्यांनी त्याला अन्य एका बँक खात्यात खाते उघडण्यास सांगून त्याला आणखीन काही रक्कम कमिशन देतो असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी अन्य एका बँकेत स्वतचे बचत खाते उघडले होते. या बँक खात्याची सर्व माहिती त्याने त्यांना दिली होती. या दोन्ही बँक खात्याचे अॅक्सेस त्यांच्याकडे होता.
23 फेब्रुवारीला त्याच्या बँक खात्यात त्याचा मित्र लालूभाई याने दोन हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यामुळे तो बँक खात्याचे बेलेन्स पाहण्याासाठी बँकेत गेला होता. यावेळी त्याला बॅकेतील कर्मचार्यांनी त्याच्या बँक खात्याचा वापर काही सायबर ठग फसवणुकीसाठी करत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याचे खाते ब्लॉक करण्यात आल्याचे समजले. या माहितीने त्याला धक्काच बसला होता. रेहान शेख आणि फैजान मणियार यांनी त्याला नोकरीच्या आमिषाने बँक खात्याची माहिती शेअर करण्यास सांगितले.
मार्च 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत या बँक खात्याची माहिती या दोघांनी सायबर ठगांना देऊन त्याचा खात्याचा वापर फसवणुकीसाठी केला होता. त्यांनी त्याच्या खात्याची माहिती सायबर ठगांना देऊन त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्याने घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून रेहान शेख आणि फैजान मणियार यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.