चौदा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या 34 वर्षांच्या आरोपीस अटक

गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच पळाला होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – गेल्या चौदा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या हरिश प्रल्हाद यादव या 34 वर्षांच्या आरोपीस वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. गंभीर दुखापतीसह अन्य कलमांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच हरिश हा पळून गेला होात. अखेर त्याला त्याला घाटकोपर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी हरिश हा मुंबईत आला होता आणि डिलीव्हरीचे काम करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.

हरिश हा घाटकोपरच्या आशापुरा इस्टेट, जंगलेश्वर मंदिराजवळील खैरानी रोड परिसरात राहत होता. 2012 साली त्याच्याविरुद्ध वडाळा टी पोलीस ठाण्यात 452, 326, 427, 34 भादवी दंड सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने त्याच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन लोकल कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता.

मात्र जामिनावर बाहेर येताच हरिश हा पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अटकपूर्व जामिन वॉरंट जारी केले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. गेल्या चौदा वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही त्याचा शोध पोलिसानी सुरुच ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना हरिश हा घाटकोपर येथे राहत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांना मिळाली होती.

या माहितीनंतर मनिष आवळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलस हवालदार भोसले, पोलीस शिपाई कुबल यांनी घाटकोपर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. आशापुरा इस्टेट परिसरात हरिश येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन शिवडीतील लोकल कोर्टात हजर केले होते. तपासात हरिश हा जामिनावर बाहेर येताच अहमदाबादला पळून गेला होता.

आठ वर्ष तो तिथेच वास्तव्यास होता. सहा वर्षांपूर्वी तो मुंबईत आला होता. तेव्हापासून तो घाटकोपर परिसरात राहून डिलीव्हरीचे काम करत होता. आता पोलीस आपल्याला पकडणार नाही असे त्याला वाटत होते. मात्र चौदा वर्षांपासून फरार असलेल्या हरिशला अखेर पोलिसांनी अटक केली. त्याच्या आधारकार्डवरुन त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले. दरम्यान त्याच्या अटकेची माहिती त्याचा भाऊ सतीश प्रल्हाद यादव याला देण्यात आली आहे.

वडाळ्यात आलेल्या बांगलादेशी पिता-पूत्रांना अटक
कारवाईदरम्यान गोवंडीतून पळाले व वडाळ्यात सापडले
अन्य एका कारवाईत वडाळा येथे आलेल्या बांगलादेशी पिता-पूत्रांना वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद नजमुल हुसैन आणि मोहम्मद शहारिया अशी या दोघांची नावे आहेत. गोवंडी येथे पोलीस कारवाईदरम्यान पत्नीसह मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते दोघेही गोवंडीतून वडाळ्यात पळून आले होते, मात्र वडाळा येथे आल्यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.

वडाळा परिसरात काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या एटीएस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शेवाळे, पोलीस शिपाई चव्हाण, बोरगावकर, कोकरे, सांगळे, शे आणि महिला पोलीस हवालदार बोरसे यांनी शांतीनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद नजमुल आणि मोहम्मद शहारिया या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत ते दोघेही पिता-पूत्र असून बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही गोवंडी परिसरात राहत होते. सोमवारी तिथे गोवंडी पोलिसांनी बांगलादेशी नागरिकाविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली होती. त्यात त्याच्या पत्नीसह एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे ते दोघेही गोवंडीतून वडाळ्यात पळून आले होते, मात्र वडाळ्यात या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या दोघांना विशेष शाखाा एकच्या मदतीने लवकरच त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page