घरफोडीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
25 लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक तर सात गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 मार्च 2026
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका आंतरराज्य टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीशी संबंधित चार रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या चारही आरोपींकडून पोलिसांनी सुमारे 25 लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. छोटूमियाँ मुबारक हुसैन, मुनावर तुश्नउद्दीन शेख, मोहम्मद रजीफुल मोहम्मद रहिम शेख आणि अचबुल चारु शेख अशी या चौघांची नावे असून ते बिहार अणि कोलकाताचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असले तरी त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
फोर्ट परिसरात आस्था ऑक्शन फर्म नावाची एक खाजगी कंपनी आहे. 23 फेब्रुवारीला रात्रीच्या वेळेस या कंपनीत घरफोडी झाली होती. अज्ञात व्यक्तीने कंपनीत प्रवेश करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने सिद्धांत महेश शेट्टी यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील पन्नासहून सीसीटिव्ही आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपींनी त्यांचा चेहरा पूर्ण झाकला होता. जेणेकरुन त्यांची ओळख पटू नये. फोर्ट येथून ते सर्वजण बिहार आणि कोलकाता येथे पळून गेल्याचे उघडकीस आले होते.
ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे, पोलीस निरीक्षक फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक् धनेश सातार्डेकर, प्रविण शिंदे, पोलीस हवालदार सचिन पाटील, समीर साळुंखे, कृष्णा गावडे, पोलीस शिपाई भागवत, पाखरे, सागर हेमाडे, प्रकाश हाके, सचिन मंडले, राहुल कांबळे यांचे दोन विशेष पथकाची नियुक्ती करुन त्यांना बिहार आणि कोलकाता येथे पाठविण्यात आले होते.
अटकेच्या भीतीने आरोपी अत्यंत दुर्गम भागात लपवून बसले होते. त्यांच्या गावी त्यांच्याविषयी माहिती काढून स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने सलग दहा दिवस विविध अडथळांना मात करुन, जिथे चारचाकी कार जात असताना अशा परिस्थितीत चार संशशितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच आस्था ऑक्शन फर्ममध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन सोनी कंपनीचे कॅमेरे, कॅमेरा किट, रोलेक्ससह तीन वेगवेगळ्या कंपनीचे तीन महागडे घड्याळ असा 25 लाख 60 हजार 141 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांच्या चौकशीतून सातहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. अटकेनंतर या चौघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. यातील मोहम्मद रजीकुल हा बिहारच्या कचना तर छोटूमियाँ, मुनावर आणि अचबुल हे दोघेही कोलकाताचे दिनापूर, कुमारजोल आणि उत्तरदिनाजपूरचे रहिवाशी आहेत. घरफोडी करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.