डिजीटल अरेस्टची भीती दाखवून 2.44 कोटीची फसवणुक

सायबर ठगांना बँक खाती पुरविणारा खातेधारक गजाआड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 एप्रिल 2026
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचा दावा करुन डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका वयोवृद्धाला 2 कोटी 44 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी हेमंत सिताराम सावंत या आरोपीस उत्तर सायबर सेल पोलिसांनी अटक केली. हेमंतने सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप असून याकामी त्याला भरमसाठ रक्कम कमिशन म्हणून मिळाल्याचे बोलले जाते. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या बँक खात्यात फसवणुकीच्या इतर गुन्ह्यांतील काही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

74 वर्षांचे नयन मधुकर खटकुळ हे दहिसर येथे राहत असून मुंबई पोर्ट ट्रस्टमधून निवृत्त झाले आहेत. जानेवारी महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात त्यांना विजय खन्ना नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचा नावाने एक सिमकार्ड घेण्यात आले असून त्याचा गैरवापर होत आहे. त्यामुळे त्यांनी बीकेसीमध्ये तक्रार करावी, नाहीतर त्यांचा सिमकार्ड बंद होईल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांचा कॉल व्हिडीओ ट्रान्स्फर केला होात. यावेळी समोरील व्यक्तीने तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. नरेश गोयलच्या मनी लॉड्रिंगमध्ये त्यांचा सभिाग उघडकीस आला आहे.

त्यांच्या नावाने एका बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यात मनी लॉड्रिंगची 25 लाखांची कॅश जमा झाली आहे. ही रक्कम नंतर नरेश गोयल याला देण्यात आली आहे. ही रक्कम त्यांना अफजल खान या व्यक्तीने पाठविली होती. यावेळी नयन खटकुळ यांनी ते नरेश गोयल आणि अफजल खान या कोणालाही ओळखत नाही. त्यांचा मनी लॉड्रिंगशी काहीही संबंध नाही असे सांगितले. मात्र समोरील व्यक्तीने त्यांचे काहीही ऐकले नाही. त्यांची चौकशी होणार आहे. त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याची भीती दाखवून त्याने त्यांच्या बँक खात्यासह एफडी, खात्यातील रक्कमेबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांना ही रक्कम त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करावी लागेल असे सांगितले.

चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांची रक्कम परत मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी बँकेतील एफडी मोडून त्यांच्या खात्यात जमा झालेली 2 कोटी 44 लाख 85 हजार 948 रुपये संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्याचा फोटो त्यांना पाठवून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी या व्यक्तीने चार ते पाच दिवसांत चौकशी पूर्ण होईल, त्यानंतर त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. मात्र या घटनेनंतर त्यांची कोणीही चौकशी केली नाही. एक आठवडा होऊन त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.

फसवणुकीचा हा प्रकार त्यांनी सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात एका बँक खात्यात फसवणुकीची मोठी रक्कम ट्रान्स्फर झाली होती. संशयित खातेधारक कल्याण येथे राहत असल्याचे उघडकीस येताच या पथकाने कल्याण येथून हेमंत सावंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच सायबर ठगांना त्याचे बँक खाते फसवणुकीसाठी दिल्याचे उघडकीस आले होते. ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा होताच त्याने ही रक्कम संबंधित सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर हेमंत सावंतला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page