लग्नावरुन झालेल्या वादातून भावी पत्नीच्या प्रियकराची हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपीला कोलकाता येथून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 एप्रिल 2026
मुंबई, – तीन दिवसांपूर्वी वांद्रे येथे अभिनवकुमार चौधरी या बिहारी सुरक्षारक्षकाच्या हत्येचा पर्दाफाश खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या मुख्य आरोपीला कोलकाता येथून अटक करण्यात आली असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. निरजकुमार बिलास चौधरी असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. भावी पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असून या प्रेमसंबंधामुळे तिचा लग्नाला विरोध असल्याचे समजताच निरजकुमार भावी पत्नीचा प्रियकर अभिनकुमार चौधरी याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्याचा एक सहकारी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सत्यमकुमार जितेंद्र सिंह हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या सांताक्रुजच्या वाकोला परिसरात राहतो. अभिनवकुमार चौधरी हा त्याचा चुलत मेहुणा असून त्याच्यासह साकेतकुमार सिंग, कन्हैयाकुमार आणि इतर दोन मित्र एकत्र राहतात. अभिनवकुमार हा वांद्रे येथील सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. 13 एप्रिलला अभिनवकुमार आणि सत्यमकुमार हे दोघेही सांताक्रुज येथून वांद्रे येथे आले होते. दुपारी सव्वादोन वाजता ते दोघेही वांद्रे येथील कल्पतरु स्पार्कल परिसरात होते. याच दरम्यान तिथे दोन तरुण आले आणि काही कळण्यापूर्वी एका तरुणाने अभिनवकुमारवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. मानेवर गंभीर दुखापत झाल्याने अभिनवकुमार हा जागीच कोसळला होता. त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते.
रक्तबंबाळ झालेल्या अभिनवकुमारला सत्यमकुमार व इतर लोकांनी तातडीने जवळच्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सत्यमकुमार सिंह याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एका आरोपीची ओळख पटली होती. हत्येनंतर आरोपी मुंबईतून पळून गेला होता. त्यामुळे आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता माळी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आटोळे, सचिन पाटील, प्रदीप लोंढे, चेतन पवार, संजय घोसाळकर, पोलीस हवालदार ठोंबरे, ठाकरे, गायकवाड, अमीत शिंदे, प्रसाद पडवळकर आदींचे दोन पथक नागपूर आणि कोलकाता येथे पाठविण्यात आले होते. त्यातील एका पथकाने आरोपी निरजकुमार चौधरी याला कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र एअरपोर्ट येथून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच अभिनवकुमारची हत्या केल्याची कबुली दिली.
तपासात अभिनवकुमार याचे प्रियाकुमारी नावाच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, या दोघांना लग्न करायचे होते, मात्र तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न निरजकुमारसोबत ठरवले होते. निरजकुमार तिला आवडत नव्हता, त्यामुळे तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. ही माहिती निरजकुमारला समजताच त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने प्रियाकुमारीचा प्रियकर असलेल्या अभिनवकुमारची हत्येची योजना बनविली होती.
ठरल्याप्रमाणे 13 एप्रिलला तो त्याच्या एका मित्रासोबत वांद्रे येथे आला होता. तिथेच त्याने त्याची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.