३६ लाखांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन कारागिराचे पलायन

आरोपी कारागिराविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जून २०२६
मुंबई, – सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे ३६ लाख रुपयांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन एका कारागिराने पलायन केल्याची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अतेनू श्रीकांत दौलुल या आरोपी कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तो त्याच्या कोलकाता येथील गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मलाय स्वरुपनारायण डे हा सोने कारागीर असून तो काळबादेवी परिसरात राहतो. याच परिसरात त्याचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. तो झव्हेरी बाजारामधील विविध ज्वेलर्स व्यापार्‍याकडून शुद्ध सोने घेऊन त्यांना विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. त्याच्याकडे काही कारागिर कामाला असून त्यात अतेनू दौलुल याचा समावेश होता. तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करत होता. या कामासाठी त्याला एक टक्के मजुरी दिली जात होती.

मार्च महिन्यांत त्यांना राजूभाई नावाच्या एका ज्वेलर्स व्यापार्‍याने सोन्याचे बांगड्या बनविण्यासाठी शुद्ध सोने दिले होते. ते शुद्ध सोने त्यांनी अतेनूला देऊन सोन्याचे बांगड्या बनविण्यास सांगितले होते. दिवसभर काम करुन सर्व कारागिर सोने एका बॉक्समध्ये दागिने ठेवत होते. २९ मार्चला अतेनू हा केस कापून येतो असे सांगून कारखान्यातून निघून गेला आणि परत आला नाही. त्यामुळे मलाय डे यांनी त्याला मोबाईल संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचा मोबाईल बंद येत होता.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात त्यांना अतेनू हा सकाळी सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेला बॉक्स घेऊन निघून गेल्याचे दिसून आले. या बॉक्समध्ये बांगड्या बनविण्यासाठी दिलेले १९३ ग्रॅम व इतर कामासाठी दिलेले ४५ ग्रॅम शुद्ध सोने होते. अशा प्रकारे अतेनू हा ३६ लाखांचे २४० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेऊन कारखान्यातून पळून गेला होता. जवळपास एक ते दिड महिना मलाय डे याला संपर्क साधून पाठपुरावा करत होते, मात्र त्याने त्यांचा कॉल घेतला नाही किंवा त्यांना पुन्हा कॉल केला होता.

तो पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसां तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अतेनू दौलुल याच्याविरुद्ध पोलिसांनी शुद्ध सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तो कोलकाताच्या हुगली, खानाकुलच्या खिदरपूरच्या गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी लवकरच एक टिम तिथे रवाना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page