४५० पॉलिसीधारकाच्या ६७ लाखांच्या पेमेंटचा अपहार करुन फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या इन्शुरन्स कंपनीच्या अधिकार्याला अटक
अरुण सावरटकर
१८ जून २०२६
मुंबई, – विविध इन्शुरन्ससाठी ४५० हून अधिक पॉलिसीधारकांनी दिलेल्या सुमारे ६७ लाख रुपयांचा परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी ऋषी गोपीनाथ दास या मुख्य आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. ऋषी हा एका खाजगी इन्शुरन्स कंपनीचा सिनिअर रिलेशनशीप मॅनेजर असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
जीवराज अग्बांझहगन हे ४२ वर्षांचे तक्रारदार पनवेलचे रहिवाशी असून गेल्या आठ वर्षांपासून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनीत कामाला आहेत. ही कंपनीत हेल्थ, गाड्याचे इन्शुरन्स तसेच इतर वस्तूंचे जनरल इन्सुरन्स काढते. त्यांच्याावर कंपनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्यास त्याचा तपास करुन कायदेशीर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही कंपनी इतर एजंट कंपन्यांच्या मदतीने काम करत असून कंपनीच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर ती रक्कम कमिशन काढून संबंधित कंपनीला दिले जाते. याच कंपनीत ऋषी दास हा ब्रोकिंग टिमममध्ये सिनिअर रिलेशनशीप मॅनेजर म्हणून काम करत होता.
त्याच्याकडे कंपनीच्या पॉलिसी समजविण्याचे, कंपनीने नेमलेल्या दलाल कंपन्यांच्या एजंटशी संबंध प्रस्थापित करुन त्यांच्याकडून पॉलिसीधारकाची माहिती अद्यावत करणे, ही माहिती कंपनीच्या पटलावर घेणे, पॉलिसीधारकाची कागदपत्रे तपासून ती माहिती कंपनीच्या मेलवर पाठविण्याची जबाबदारी होती. अनेकदा पॉलिसीधारक कंपनीच्या अकाऊंटवर पेमेंट करत होते. ही रक्कम तपासून नंतर पॉलिसीधारकांना पॉलिसी देण्याचा अधिकारी ऋषीसह इतर सेल्स मॅनेजरकडे होता. गेल्या काही वर्षांपासून कंपनीत आर्थिक घोटाळा होत असल्याचे काही अधिकार्यांच्या लक्षात आले होते, त्यामुळे कंपनीचे एरिया मॅनेजर पुनित रॉय यांनी तक्रार करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यावी विनंती केली होती.
या तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकार्यांनी कंपनीच्या मागील काही वर्षांच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट सुरु केले होते. त्यात ऋषी दासने काही महिन्यांत पॉलिसीधारकाचे पैसे स्वतसह त्याच्या पत्नीच्या च्या बँक खात्यात बेकायदेशीरीत्या वळविल्याचे दिसून आले होते. याबाबत त्याची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत त्याने कंपनीत ७० लाखांचा आर्थिक घोटाळा केल्याची कबुली दिली होती. जवळपास ४५० हून अधिक पॉलिसीधारकाच्या पैशांचा परस्पर अपहार करुन त्याने कंपनीची फसवणुक केली होती. ही रक्कम कंपनीला परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने त्यापैकी तीन लाख रुपये कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले.
मात्र उर्वरित ६७ लाख रुपये कंपनीत जमा न करता त्याने ती रक्कम स्वतसह इतर कामासाठी वापरल्याचे सांगितले. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता.हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने जीवराज अग्बांझहगन यांनी वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ऋषी दासविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून फरार असलेल्या ऋषी दास याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने कंपनीत आर्थिक घोटाळा केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.