ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक करणारा रेकॉर्डवरील आरोपी गजाआड

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सात फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जुलै २०२६
मुंबई, – सोने खरेदीचा बहाणा करुन ऑनलाईन पेमेंट केल्याची बतावणी करुन सोन्याचे दागिन्यांचा अपहार करुन ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक करणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस डोंगरी पोलिसांनी अटक केली. राहुल प्रकाश कर्पे असे या ३२ वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून एका गुन्ह्यांतील सोन्याची चैन आणि कॅश हस्तगत करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून तयंच्या मालकीचे डोंगरीतील नजमबागसमोर, चीनवाला इमारतीमध्ये लालचंद भुरमल नावाचे एक ज्वेलर्स दुकान आहे. २७ जूनला सायंकाळी ते दुकानात होते. यावेळी त्यांच्या दुकानात एक तरुण आला होता. त्याने त्याचे नाव नवदीप कांबळे असल्याचे सांगून त्याला एक सोन्याची अंगठी खरेदी करायची आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला विविध सोन्याचे अंगठी दाखविण्यास सुरुवात केली. त्यापैकी ८२ हजाराची एक अंगठी त्याने पसंद केली. यावेळी त्याने त्यांना ४२ हजार कॅश दिले तर उर्वरित ४० हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करतो असे सांगितले. त्याने दुकानातील क्यूआर कोड घेतला आणि त्याच्या मोबाईलमधील बोगस ऍप ओपन करुन त्यांना ४० हजार रुपये पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर सोन्याची अंगठी घेऊन तो दुकानातून निघून गेला होता. काही वेळानंतर तक्रारदारांना ४० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसल्याचे दिसून आले.

फसवणुकीचाहा प्रकार उघडकीस येताच त्यांनी डोंगरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना दिले होते. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपासात आरोपी एका बाईकवरुन दुकानात आला होता. याच बाईकवरुन तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा डोंगरी, माझगाव, काळाचौकी आणि सायन परिसरात पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी कल्याण येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बळकवडे, पोलीस उपायुक्त मनिष कळवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे, पोलीस हवालदार प्रविण शिंदे, किरण मोरे, पोलीस शिपाई गौरव सावंत, प्रदीप कचरे, अतुल वानखेडे यांनी कल्याण परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून राहुल कर्पे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी काही कॅश आणि सोन्याची चैन जप्त केली आहे. हा मुद्देमान मानपाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा असल्याचे उघडकीस आले.

तपासात राहुल कर्पे हा कल्याणच्या कार्पेवाडी, श्रम साफल्य निवास इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक दोनमध्ये राहतो. तो अशा प्रकारे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध डोंगरी, काळाचौकी, एपीएमसी, नारपोली, मानपाडा, कोपरी आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेने फसवणुकीच्या सातहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील सोन्याची अंगठी लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page