४१ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसयिकाला अटक व कोठडी

फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जुलै २०२६
मुंबई, – सुमारे ४१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अल बाझ डेव्लपर्सचा संचालक आणि व्यावसायिक अन्सार अहमद कुरेशी याला डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इम्रान गुलाब गुलाब खान हे अंधेरीतील रहिवाशी असून जोगेश्‍वरी येथे त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. एप्रिल २०२५ रोजी त्यांचे घर पुर्नविकासासाठी जाणार होते, त्यामुळे त्यांनी एक फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राने त्यांची ओळख अन्सार कुरेशी याच्याशी करुन दिली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्यांना तो अल बाझ डेव्हल्पर्सचा संचालक तसेच शेअर होल्डर असल्याचे सांगितले. त्याचे ओंकार डेप्हलपर्ससोबत एक करार झाला असून या कंपनीकडून मालाड येथे एका नवीन इमारतीचे बांधकाम तयार आहे. तिथे त्यांना स्वस्तात फ्लॅट देण्याचे आशवासन दिले होते. त्यांचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्यांना मालाड येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ओंकार सिग्नेट अपार्टमेंटच्या ए विंगच्या २९ व्या मजल्यावरील २९०२ क्रमांकाचा फ्लॅट दाखविला होता.

या फ्लॅटची किंमत ७० लाख रुपये होती. त्यांनी त्याला २५ लाख रुपये द्यावे, रजिस्ट्रेशननंतर दरमाह ५० हजार रुपये दिले की फ्लॅटचा ताबा देण्यात येईल असे सांगून त्यांना त्यासाठी कुठल्याही बँकेतून कर्ज काढण्याची गरज नाही असे सांगितले. त्याची ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी तोच फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे मे ते जून २०२५ या कालावधीत त्यांनी अन्सारी कुरेशीला २६ लाख रुपये ऑनलाईन तर पंधरा लाख कॅश स्वरुपात दिले होते. मात्र पेमेंटनंतर त्याने फ्लॅटचे रजिस्टेशन केले नाही किंवा फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. विचारणा केल्यानंतर त्याला वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. त्याच्या मेहुण्याची भेट घेतल्यानंतर त्याने त्यांना अन्सारकडे कुठलाही फ्लॅट नसून तो अशाच प्रकारे अनेकांना गंडा घालत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा सुरु केला होता. यावेळी त्याने त्यांना २६ लाख ५० हजार आणि १५ लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना पैसे देणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली.

अशा प्रकारे अन्सार कुरेशीने फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ४१ लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अन्सारविरुद्ध डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु सआतना अन्सार कुरेशीला पोलिसांनी अटक केली.

चौकशीत त्याने इम्रान खान यांनी दिलेल्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन त्यांचा फ्लॅटचा ताबा न देता फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने फ्लॅटच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page