शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्धाची ऑनलाईन फसवणुक
गेल्या दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जुलै २०२६
मुंबई, – गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका वयोवृद्धाची शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीला दहा महिन्यानंतर तामिळनाडू येथून वांद्रे पोलिसांनी अटक केली. टी सोलोमन राजा असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडून पोलिसांनी चार वेगवेगळ्या बँकेचे डेबीट आणि क्रेडिट कार्ड जप्त केले आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नाशिक शहर सायबर सेल पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद आहे तर तीन गुन्ह्यांची फसवणुकीची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे आतापर्यंत पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
६८ वर्षांचे वयोवृद्ध तक्रादार वांद्रे येथे राहत असून ते एका नामांकित बँकेतून कॅशिअर म्हणून निवृत्त झाले आहेत. ३० जुलै ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत त्यांना प्रतिक बियानी नावाच्या एका व्यक्तीने संपर्क साधून त्यांना तो असियन मार्केट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संचालक असल्याचे सांगितले. त्याने त्यांना त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यच्या कंपनीमार्फत विविध शेअरमध्ये ३ लाख ६२ हजार २५३ रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र त्यांना कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम न देता त्याने त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रतिक बियानी नाव सांगणार्या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक् रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यात फसवणुकीची काही रक्कम एका बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम नंतर चेकद्वारे काढण्यात आली होती. ते बँक खाते चेन्नईतील एका व्यक्तीच्या नावावर होते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपिल शिरसाट, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस शिपाई गणेश गडदाकी, योगेश सरवदे आदी पोलीस पथक चेन्नईला गेले होते.
या पथकाने खातेदाराच्या घरी जाऊन चौकशी केली, मात्र तो तिथे वास्तव्यास नसल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने तांत्रिक माहितीवरुन साध्या वेशात पाळत ठेवून टी सोलोमन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. तो सधश्या तामिळनाडूच्या चेंगलपट्टी, ओल्ड पेरीनगत्तुरचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध नाशिक सायबर सेल पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्याच्या बँक खात्यात इतर तीन गुन्ह्यांतील रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सायबर पोर्टलवर संबंधित तीन तक्रारीची नोंद आहे. गुन्हा घडल्यानंतर तो सतत स्वतचे वास्तव्य बदलत होता, अखेर त्याला दहा महिन्यानंतर गजाआड करण्यात पोलिसांन यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार वेगवेगळ्या बँकेचे डेबीट आणि क्रेडिट कार्ड जप्त केले आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.