आमदारासह त्यांचा पीए असल्याचे सांगून फसवणुक करणारा गजाआड

दोन गुन्ह्यांची उकल तर इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जुलै २०२६
मुंबई, – भाजपाचे आमदार संजय उपाध्याय यांचा पीए तसेच स्वत आमदार असल्याचे सांगून फसवणुक करणार्‍या एका ठगाला अखेर बोरिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. भालिंद्रपाल बनदेवसिंग सेहगल असे या ठगाचे नाव असून तो पंजाबचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने बोरिवली आणि दहिसर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले तर त्याच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील तक्रारदार तुषार गिरीश मजिठिया असून काही दिवसांपर्वूी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप कॉल केला होता. यावेळी त्याने भाजपा आमदार संजय उपाध्याय यांचा पीए तसेच स्वत आमदार असल्याचे भासवून त्यांच्याकडे एका लखनऊ युनिव्हरसिटीमध्ये शिकवणी शुल्क भरायची आहे असे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम ऑनलाईन घेतली होती. याच दरम्यान त्यांचा मित्र भरत रतीलाल शहा यांनाही त्याने कॉल करुन अशाच प्रकारे बतावणी करुन लखनऊ येथील रिजंठा हॉटेल बुक करायचे आहे असे सांगून टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स वॉलेटमधून आठ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले होते. या दोघांना नंतर संबंधित व्यक्ती फ्रॉड असून तो स्वतला आमदाराचा पीए तसेच स्वत आमदार असल्याचे सांगून गंडा घालत असल्याचे समजले होते.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, दिग्विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्ता गोरे, राजू कोरडे व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता.

तांत्रिक माहितीसह मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी भालिंद्रपाल सेहगल याला ताब्यात घेतले. तपासात त्यानेच संजय उपाध्याय व त्यांचा पीए असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याची कबुली दिली. भालिंद्रपाल हा मूळचा पंजाबच्या मोहाली, सेक्टर ५५ चा रहिवाशी आहे. तो अनेकांना कॉल करुन आमदार संजय उपाध्याय किंवा त्यांचा पीए असल्याचे सांगत होता. त्यांना ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करत होता.

तपासात त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे दहिसर पोलीस ठाण्यात एक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page