पत्नीची हत्या करुन पळून गेलेल्या पतीला काही तासांत अटक
मुलीच्या शिक्षणासह चारित्र्यावरुन होणार्या वादातून हत्येचा संशय
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२६
मुंबई, – पत्नीची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला काही तासांत ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. धिरज कलेक्टर पवार असे या ३६ वर्षीय आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर त्याची पत्नी झुमरी धिरज पवार हिची धारदार हत्याराने वार करुन हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीच्या शिक्षणासह चारित्र्याच्या संशयावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. चौकशीनंतर या हत्येमागील कारणाचा खुलासा होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले.
ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता जोगेश्वरीतील आदर्शनगर, अस्टूर इमारतीसमोर घडली. धिरज आणि झुमरा हे दोघेही पती-पत्नी असून मूळचे भुसावळचे रहिवाशी आहेत. ते तिघेही बिगारी कामगार म्हणून काम करतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शहरात कामासाठी जावे लागत होते. दोन दिवसांपूर्वी धिरज आणि झुमरा हे भुसावळ येथून मुंबईत आले होते. मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता ते दोघेही आदर्शनगर, अस्टूर इमारतीसमोर होते. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादानंतर रागाच्यास भरात त्याने झुमरावर धारदार हत्याराने वार केले होते. रक्तबंबाळ झालेली झुमरा ही जागीच कोसळली होती, त्यानंतर तो तेथून पळून गेला. अस्टूर इमारतीसमोर एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
तिला पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीदरम्यान तिचे नाव झुमरा पवार असल्याचे उघडकीस आले होते. तिच्यासोबत तिचा पती होता, मात्र या घटनेनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खराडे, पोलीस उपनिरीक्षक उदागे, पोलीस हवालदार सिद्धार्थ भंडारे, धनंजय जगदाळे, विनोद राठोड, आनंद पवार, पोलीस शिपाई अजीत बंगड, विठ्ठल सकट, आकाश बागल यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे धिरज पवार याला एक तासांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच त्याची पत्नी झुमरा हिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यांना एक मुलगी असून तिच्या शिक्षणावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून खटके उडत होते. त्यातच धिरजला झुमराच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता. गंगळवारी अशाच एका कौटुंबिक वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याने तिची हत्या करुन घटनास्थळाहून पलायन केले होते. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली.
अटकेनंतर धिरजला बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुर आहे. हत्येमागे चारित्र्याचा संशय, मुलीचा शिक्षणासह इतर काही कारण होते का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.