चांगल्या ब्रॅण्डसोबत कामाच्या आमिषाने अभिनेत्रीची फसवणुक
डॉक्टरसह तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२६
मुंबई, – बिग बॉस २०२६ कार्यक्रमासह इतर चांगल्या ब्रॅण्डसोबत जाहिरातीचे काम देण्याची बतावणी करुन एका अभिनेत्रीसह व्यावसायिक तरुणीची तिघांनी सुमारे साडेअकरा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका डॉक्टर महिलेसह तिघांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रक्षीत कोठारी, वैशाली रक्षीत कोठारी आणि डॉ. खुशी ठक्कर अशी या तिघांची नावे असून ते तिघेही परफेक्ट वुमन मॅगझीन या कंपनीचे संचालक आहेत. या तिघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचाही पोलिसांकडून स्वतंत्र तपास सुरु आहे.
२५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मूळची आसामच्या दिसपूर, काहिलीपाडा, नाईस नोवेलची रहिवाशी आहे. ती सध्या अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरात राहते. ती ऍक्टर असून तिचा स्वतचा व्वसाय आहे. तिला फॅशन क्षेत्रासह बॉलीवूडमध्ये करिअर करायचे होते, त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत तिची रक्षीत कोठारी, वैशाली कोठारी आणि खुशी ठक्कर यांच्याशी ओळख झाली होते. कोठारी यांचा परफेक्ट वुमन मॅगझीन नावाची एक कंपनी असून ही कंपनी फॅशन क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांनी तिला चांगल्या ब्रॅण्डसोबत फॅशन शो, बिग बॉस २०२६ आणि इतर बॅ्रण्ड कंपनीसोबत जाहिरातीचे काम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातून तिला चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
याच कामासाठी त्यांनी तिच्याकडून डिसेंबर २०२५ ते जुलै २०२६ या कालावधती टप्याटप्याने साडेअकरा लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिला कुठल्याही कंपनीसोबत काम मिळवून दिले नाही. ठरल्याप्रमाणे तिच्याशी व्यावसायिक करार केला नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे दिले नाही. या प्रकारानंतर तिने कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रक्षीत कोठारी, वैशाली कोठारी आणि डॉ. खुशी ठक्कर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. यातील कोठारी हे मालाडच्या मार्वे रोड, आदर्श दुग्धालय प्लॉट, श्रद्धा अपार्टमेंट तर डॉ. खुशी ठक्कर ही अंधैरीतील वर्सोवा-यारी रोड, रोहनिक अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.