समलैगिंक आकर्षणाला कंटाळून ४२ वर्षांच्या सहकार्‍याची हत्या

हत्येसह पुरावा नष्ट करणार्‍या दोन्ही मारेकर्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जुलै २०२६
कल्याण, – समलैगिंक आकर्षणाला कंटाळून आपल्याच ४२ वर्षांच्या सहकार्‍याची त्याच्या दोन मित्रांनी हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र कल्याण गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना अवघ्या काही दिवसांत या हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही मारेकर्‍यांना अटक केली. मृत व्यक्तीचे नाव किशोरचंद्र कार्तिक साहू तर अटक आरोपींचे नाव ज्ञानेश्‍वर दत्तात्रय कंठे आणि सौरभ विश्‍वनाथ गोल्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते तिघेही मुरबाड येथील मिंडा ंकंपनीचे कर्मचारी आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

२८ जूनला कल्याणच्या अहिल्यानंतर मार्गावरील मामनोली गावच्या हद्दीत कल्याण तालुका पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या करुन अज्ञात मारेकर्‍याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती प्राप्त होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला होता. या हत्येची पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार रारठोड, अप्पर पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांनी गंभीर दखल घेत कल्याण गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके, मुकेश ढगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाठ, दत्तात्रय नलावडे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, भाऊसाहेब गायकवाड, जयवंत बारा, श्याम आरगाळकर, पोलीस हवालदार सतीश कोळी, गोविंद कोळी, हेमंत विभुते, पोलीस शिपाई स्वप्निल बोडके, सुरेश धिंदळे, पोलीस हवालदार प्रशांत बडगे, पोलीस नाईक हरिश्‍चंद्र झांजे, भाऊराव भोई, हरेश लोणे, सहाय्यक फौजदार मुस्तफा शेख, पोलीस नाईक सुरेश सानप, सुनिल फसाळे, अतुल खेडकर, पोलीस शिपाई योगेश निर्मळ, कुणाल बावदाने, अजीत काळे, तुषार कोळी, पोलीस हवालदार रामा शिंदे, सायबर विभागाचे पोलीस हवालदार रविंद्र मोरे, दिपक गायकवाड, आदीच्या सहा विशेष पथकाने तपास सुरु केला होता.

मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले होते. त्यात पोलिसांना यश आले. तपासात मृत व्यक्तीचे नाव किशोरचंद्र कार्तिक साहू असल्याचे उघडकीस आले. तो मुरबाडच्या देवगाव परिसरात राहत होता तर तेथील मिंडा कंपनीत कामाला होता. कंपनीतील काही कर्मचार्‍यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्‍वर कंठे आणि सौरव गोल्हे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही हत्या केल्याची कबुली दिली. समलैगिंक आकर्षणाला कंटाळून त्यांनी ही हत्या केली होती.

ठरल्याप्रमाणे त्यांनी किशोरचंद्रला कल्याणच्या अहिल्यानगर मार्गावरील मानोली गावच्या हद्दीत बोलाविले होते. तिथे त्याची हत्या केल्यानंतर या दोघांनी हत्येचा पुरावा नष्ट केला हेता. त्याच्याकडील सर्व दागिने आणि कॅश चोरी करुन ते दोघेही पळून गेले होते. या हत्येचा कुठलाही पुरावा त्यांनी मागे सोडला नव्हता. तरीही तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करुन दोन्ही आरोपी सहकार्‍यांना शिताफीने अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यंत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page