एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने २६ लाखांची फसवणुक

रेल्वेच्या सहकारी कर्मचार्‍यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२६
मुंबई, – एमबीबीएस प्रवेशाच्या नावाने मध्य रेल्वेच्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर अधिकार्‍याची चारजणांच्या एका टोळीने सुमारे २६ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी युग शर्मा, मंगेश भारनुके, प्रदीप जगन्नाथ सोनावणे आणि विणा सोनावणे या चौघांविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील प्रदीप सोनावणे हा त्यांचा रेल्वेचा सहकारी असून वीणा ही त्याची पत्नी आहे. त्यांनीच इतर दोघांची तक्रारदाराशी ओळख करुन दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने या चौघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.

रमाकांत नारायण शेट्ये हे सायन प्रतिक्षानगर परिसरात राहत असून मध्य रेल्वे लोको कारखान्यात सिनिअर सेक्शन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत रेल्वेत नोकरी करणारे प्रदीप जगन्नाथ सोनावणे हे त्यांचे जवळचे मित्र असून ते दोघेही एकमेकांच्या गेल्या पंधरा वर्षांपासून ओळखतात. त्यांची मुलगी रक्षीताने गेल्या वर्षी नीटची परिक्षा दिली होती. त्यात तिला दोनशे गुण मिळाले होते. त्यामुळे तिला एमबीबीएससाठी प्रवेश हवा होता. याबाबत त्यांनी प्रदीपला सांगितले होते. यावेळी त्यांची पत्नी विणा सोनावणे हिने त्यांचा परिचित मंगेश भारनुके हा त्यांच्या मुलीला एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देईल. त्याने आतापर्यंत अनेकांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून दिला आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी मंगेशला त्यांच्या घरी बोलावून घेतले होते. त्यांनी त्याच्याशी रक्षीताच्या प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली होती. यावेळी त्याने तिला पुण्यातील सिम्बॉसिस मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून तीस लाख रुपये डोनेशन तर वर्षांला पंधरा लाख रुपये फी भरावी लागेल असे सांगितले.

याबाबत त्यांच्यात एकमत झाले, त्यानंतर त्याने तिचे सर्व कागदपत्रे घेतले होते. याच दरम्यान प्रदीप व मंगेशने त्यांची युग शर्माशी ओळख करुन दिली. ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रदीपने वीणा सोनावणे हिच्या नावाने त्यांच्याकडून अकरा लाखांचा एक धनादेश घेतला होता. काही दिवसांनी प्रवेशासाठी उशीर झाल्याने तिला पुण्याऐवजी मध्यप्रदेशच्या भोपाळ शहरातील रामकृष्ण मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आश्‍वासन दिले होते. अकरा लाख रुपये मिळाले असून आणखीन ३१ लाखांची व्यवस्था करा असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला दहा लाख कॅश तर ९ लाख ५४ हजाराचा एक डीडी दिला होता. ही रक्कम त्यांनी मंगेश, युग आणि प्रदीप सोनावणे यांना दिली होती. नोव्हेंबर महिन्यांत त्यांनी त्यांच्याकडे तातडीने पाच लाखाची मागणी केली होती, त्यामुळे त्यांनी त्याला पाच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. नोव्हेंबर महिन्यांत त्यांनी प्रवेशाबाबत विचारणा केली असता त्यांनी रक्षीताचे शंभर टक्के ऍडमिशन होणार असून त्यासाठी मॅनेजमेंट कोट्यातून अर्ज करण्यात आल्याचे सांगितले.

याच दरम्यान त्यांनी डीडी त्यांच्याकडून हरविला असून ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. मात्र ओरिजनल धनादेश मिळत नसल्याने ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाला नव्हता. डिसेंबर महिन्यांत त्यांनी त्यांना भोपाळ येथे येण्यास सांगितले. त्यामुळे ते सर्वजण भोपाळला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी प्रवेशाबाबत काहीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे ते पुन्हा मुंबईत निघून आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी रक्षीताला सांगलीच्या प्रकाश इन्स्टिटूट ऑफ मेडीकल सायन्स ऍण्ड रिसर्च सेंटर येथे प्रवेश देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एक कोटी पाच लाखांची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्यास नकार देत त्यांच्या पैशांची मागणी केली होती. एमबीबीएस प्रवेशासाठी त्यांनी या चारही आरोपींना पाच लाख रुपये ऑनलाईन, दहा लाख रुपये कॅश आणि अकरा लाख धनादेशाद्वारे असे एकूण २६ लाखांचे पेमेंट केले होते. मात्र त्यांनी प्रवेश न देता त्यांची फसवणुक केली होती.

दिलेले पैसे परत न करता ते चौघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच रमाकांत शेट्ये यांनी वडाळा टी टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर युग शर्मा, मंगेश भारनुके, प्रदीप जगन्नाथ सोनावणे आणि विणा सोनावणे या ंचौघांविरुद्ध पोलिसांनी एमबीबीएस प्रवेशासाठी घेतलेल्या २६ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page