रॉबरीच्या गुन्ह्यांतील आरोपीस २६ वर्षांनंतर अटक करण्यात यश
लोकल कोर्टातून जामिनावर बाहेर येताच पळून गेला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – रॉबरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस २६ वर्षांनी खार पोलिसांनी अटक केली. सुनिल अशोक माळी असे या आरोपीचे नाव असून वांद्रे कोर्टातून जामिनावर बाहेर येताच सुनिल हा पळून गेला होता, गेल्या २६ वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला फेरअटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुन्हा वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
सुनिल माळी हा सायन परिसरात राहत होता. २००० साली त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठासण्यात रॉबरीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन वांद्रे कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याला कोर्टाने वॉण्टेड आरोपी घोषित करुन त्याच्याविरुद्ध जाहीरनामा जारी केला होता.
तसेच खार पोलिसांना त्याच्या अटकेचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. सायन येथील त्याच्या घरी गेल्यानंतर पोलिसांना त्याची चाळ तुटलेली दिसून आली होती. तो सध्या कुठे राहतो याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हती. गेल्या २६ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असातना सुनिल माळी हा सायन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस निरीक्षक सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलीस हवालदार गुरव, पोफळे, पवार, माने, पेडणेकर, ठोंबरे आदी पथकाने सायन परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शनिवारी सायंकाळी तिथे सुनिल आला होता, यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तोच रॉबरीच्या गुन्ह्यांत गेल्या २६ वर्षांपासून वॉण्टेड असलेला आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला फेरअटक करुन वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. तांत्रिक माहितीवरुन आरोपीची माहिती काढून त्याला २६ वर्षांनी अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे व त्यांच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.