२५ कोटीच्या कर्जाचे गाजर दाखवून व्यावसायिकाला ३० लाखांना गंडा

कर्जाचे आमिष दाखवून गंडा घालणार्‍या चौकडीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – व्यवसाय वाढीसाठी २५ कोटीच्या कर्जाचे गाजर दाखवून एका लेबर कॉन्ट्रक्टर व्यावसायिकाची चारजणांच्या टोळीने सुमारे ३० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिससरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह त्याच्या तीन सहकार्‍याविरुद्ध सहार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जईद अन्सारी, संसारी बेहेरा, प्रशांत खंडेलवाल आणि विवेक जयस्वाल अशी या चौघांची नावे असून पळून गेलेल्या या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

५८ वर्षाचे तक्रारदार किशोर जनार्दन पाटील हे लेबर कॉन्ट्रक्टर म्हणून काम करत असून सध्या विरारच्या फुलपाडा रोड, साई म्हात्रे निवासमध्ये राहतात. त्यांना त्याचा व्यवसायाच्या विस्तासाठी मोठ्या रक्कमेच्या कर्जाची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरु केले ाहेते. गेल्या वर्षी त्यांचा मित्र चंदन गुप्ता यांनी त्यांना संसारी बेहरा याच्याविषयी माहिती दिली होती. संसारी हा मोठा उद्योगपती, व्यावसायिक आहे, त्याने आतापर्यंत अनेकांना मोठ्या प्रमााणात कर्ज मिळवून दिले आहे. त्यामुळे तो त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी नक्कीच आर्थिक मदत करेल असे सांगून त्याचा मोबाईल क्रमांक दिला होता. हा मोबाईल प्राप्त होताच त्यांनी संगारीला संपर्क साधून भेटण्याची विनंती केली होती.

ठरल्याप्रमाणे त्यांची भेट झाली आणि त्यांनी त्याला त्यांच्या व्यवसायाची माहिती दिली. या व्यवसायासाठी त्यांना कर्जाची गरज असल्याचे सांगताच त्याने त्यांना २५ कोटीचे व्यावसायिक कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले. याच दरम्यान त्याने त्यांची ओळख प्रशांत खंडेलवाल, विवेक जयस्वाल आणि जईद अन्सारीशी करुन दिली होती. या तिघांच्या मदतीने त्यांना कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले होते. काही दिवसांनी आरोपींनी किशोर पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आयटीसी मराठा हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथेच त्यांची कर्जाविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी आरोपींनी त्यांची मोठ्या आर्थिक संस्था तसेच विदेशी गुंतवणुकदाराशी ओळख असल्याचे त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्याचे मान्य केले होते.

कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी बॉण्ड आणि विविध शासकीय शुल्क भरण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, त्यांच्यावर विश्‍वास ठवून त्यांनी त्यांना टप्याटप्याने तीस लाख दहा हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना कर्ज मंजूर करुन दिले नाही. वारंवार विचारणा करुनही ते चौघेही त्यांना प्रतिसाद देत नव्हते. नंतर त्यांनी त्याचे मोबााईल बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जईद अन्सारी, संसारी बेहेरा, प्रशांत खंडेलवाल आणि विवेक जयस्वाल या चौघांविरुद्ध २५ कोटीचे कर्ज देतो असे सांगून कर्जासाठी घेतलेल्या तीस लाख दहा हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page