स्वतव्या आर्थिक फायद्यासाठी दिड वर्षांच्या मुलाची विक्री

पित्याला अटक तर मातेसह अन्य एका महिलेचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२६
मुंबई, – स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी माता-पित्याने त्यांच्याच दिड वर्षांच्या मुलाची एका महिलेला एक लाखांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार धारावी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकाराचा मुलाच्या मामाने पर्दाफाश करुन स्वतच्या बहिणीसह भावोजी तसेच मुलगा विकत घेणारी महिला अशा तिघांविरुद्ध धारावी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पिता संदीप जनराज सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत संदीपची पत्नी रोली संदीप सिंग आणि राणी या दोघींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

सनी शिवबहादूर सिंग हा ३९ वर्षांचा तक्रारदार तरुण सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून सध्या गोरेगाव येथील लिंक रोड, भगतसिंग नगरात राहतो. सिंग कुटुंबिय मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास आहे. रोली ही त्याची बहिण असून ती तिच्या कुटुंबियांसोबत धारावी परिसरात राहते. तिला अनंत नावाचा दिड वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी ६ ऑगस्टला पावसात पाय घसरुन तो पडला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. अशी माहिती रोलीने तिची आई गीतासिंग हिला सांगितली होती. ही माहिती गिता सिंग हिच्याकडून सनीला समजताच त्याने रोली व तिचा पती संदीप यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र वारंवार कॉल करुनही या दोघांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो स्वत सायन हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याने रोली आणि संदीपचा शोध घेतला, मात्र तिथे त्याला ते दोघेही सापडले नाही. त्यामुळे तो रोली राहत असलेल्या तेवर इमारतीजवळ गेला होता. यावेळी घरीच असलेल्या संदीप आणि रोलीने त्याला अनंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असे सांगितले. यावेळी त्याने मुलाला शवविच्छेदनासाठी पाठविले असताना ते दोघेही घरी काय करतात, हॉस्पिटलमध्ये कोण आहे याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला संदीपने हॉस्पिटलमध्ये त्याचा भाऊ अवैधसिंग असल्याचे सांगितले. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद होता, त्यामुळे सनीने त्यांच्याकडे अनंतविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी रोली आणि संदीपने त्यांच्याच दिड वर्षांचा मुलगा अनंत याला राणी नावाच्या एका महिलेला २ ऑगस्टला विक्री केल्याची कबुली दिली. त्यातून त्यांना राणीने एक लाख पाच हजार रुपये दिल्याचे सांगितले. स्वतच्या मुलाची विक्री करताना त्यांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. तसे न करता त्यांनी राणीकडून मुलाची विक्री करुन पैसे घेतले होते. त्यामुळे सनीने घडलेला प्रकार धारावी पोलिसांना सांगून त्याच्या बहिणीसह भावोजी आणि त्यांचा मुलगा विकत घेणार्‍या महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदीप सिंग, रोली सिंग आणि राणी या तिघांविरुद्ध पोलिसांनी अल्पवयीन न्याय कायदा आणि भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच संदीप सिंगला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत रोली आणि राणी यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. संदीप आणि रोलीने अशाच प्रकारे इतर मुलांची खरेदी-विक्रीचा व्यवहार केला आहे, याकामी त्यांना इतर कोणी मदत केली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page