शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणार्या आरोपीस अटक
ट्रस्टच्या बँक खात्यात २.५४ कोटी जमा झाल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका नामांकित कंपनीतून वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झालेल्या वयोवृद्ध महिलेची सुमारे ३१ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. तन्वीर अहमद अकबर कुरेशी असे या ४१ वर्षीय आरोपीचे नाव असून तो कुर्ल्याच्या जमाद चाळीचा रहिवाशी आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी जोशवा रत्नम कालकुरी, योगेश दिलीप सोळंकी आणि कुणाल कैलास मस्के या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. यातील जोशवाने गॉड ऑफ अँगल या ट्रस्टच्या नावाने उघडलेल्या बँकेत २ कोटी ५४ कोटी रुपये जमा झाल्याचे तसेच ही रक्कम एपीके फाईलच्या सहाय्याने ऍक्सेस देऊन तन्वीरने वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्झेंशन केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
६२ वर्षांची तक्रारदार महिला कृती अशोक अवलानी ही गोरेगाव परिसरात राहते. ती एका खाजगी कंपनीतून वरिष्ठ उपाध्याक्ष म्हणून निवृत्त झाली आहे तर तिचे पती अशोक अवलानी हे वकिल म्हणून काम करतात. सध्या ते दोघेही कल्सल्टन्स म्हणून काम पाहतात. ंगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत तिला व्हॉटअपवर एक लिंक आली होती. त्यात अज्ञात व्यक्तीने तो सॅमको सिक्युरिटी कंपनीचा सीईओ असून ही कंपनी एआय बेस गुंतवणुक करते. त्यात प्रचंड फायदा असून तिची इच्छा असल्याने तिला पंधरा दिवसांची फ्रीमध्ये मेंबरशीप मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने गुगलवर कंपनीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी त्याने तिला कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या गुंतवणुक योजनेची माहिती दिली जात होती.
अनेकांनी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेअर योजनेत गुंतवणुक केली होती, त्यात त्यांना प्रचंड फायदा होत असल्याची माहिती संबंधित सभासद ग्रुपमध्ये शेअर करत होते. त्यामुळे तिनेही कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान तिने वेगवेगळ्या शेअरमध्ये ३१ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणुक केली. मात्र तिला मूळ रक्कमेसह गुंतवणुक रक्कमेवर कुठलाही परतावा मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तांत्रिक माहितीवरुन जोशवाला बदलूपर, योगेशला बोरिवली तर कुणाल मस्के याला मालाड येथून ताब्यात घेतले.
चौकशीत या तिघांचाही गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत तन्वीर कुरेशीचा सहभाग उघडढकीय येताच त्याला कुर्ला येथून पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात या आरोपींनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना वेगवेगळ्या बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर होत होती. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात आतापर्यंत अडीच कोटीचा व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील एक खाते जोशवा याने ऑड ऑफ अँगल या ट्रस्टच्या नावाने उघडले होते.
याच खात्यात ही रक्कम जमा झाल्यानंतर तन्वीरने २३ ऑक्टोंबर ते २५ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत एपीके फाईलच्या सहाय्याने ऍक्सेस पुढे देऊन २ कोटी ५४ लाख रुपयांचे ऑनलाईन ट्रान्झेंशन केले होते. याच बँक खात्यात तक्रारदार महिलेची फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. या संपूर्ण कटात तन्वीरने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्याला अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.