मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ ऑगस्ट २०२६
मुंबई, – साकिनाका येथील एका व्यावसायिकाच्या खाजगी कार्यालयात झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात साकिनाका पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. रमजान मकसूद साह, जिशान अब्दुल साबुध खान, अख्तर हुसैन गुलाम मुर्तजा खान आणि इरफान नूरउल्ला खान अशी या चौघांची नावे असून ते चौघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. सध्या ते चौघेही साकिनाका आणि मुंब्रा परिसरात वास्तव्यास होते. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा ४४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर चारही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मद हुसैन अब्दुल करीम खान हे व्यावसायिक असून ते अंधेरी-कुर्ला रोड, जरीमरी, स्पेंंटा प्लाझिओ अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे एस. पी इंटरप्रायजेस नावाचे एक कार्यालय साकिनाका येथील असल्फा, अनिस कंपाऊंडमध्ये आहे. २५ जुलैला रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी कार्यालयातील दोन लाखांची कॅश, ४४ लाखांचे २२ किलो चांदी आणि शॉपमध्ये झोपलेल्या दोन कामगारांचे दोन मोबाईल असा ४६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस येताच त्यांच्या कर्मचार्याने ही माहिती मोहम्मद हुसैन खान यांना दिली होती. त्यामुळे ते त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना अज्ञात व्यक्तींनी सुमारे ४६ लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचे दिसून आले.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक सचिन उगले, राजेंद्र माळी व अन्य पोलीस पथकाने रमजान साह आणि जिशान खान या दोघांना मुंब्रा, अख्तर खान याला भांडुप तर इरफान खान याला गोवंडी येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे सर्व चांदी, मोबाईल असा ४४ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडूनत तपास सुरु आहे. त्यांच्याकडून उर्वरित चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन उगले, राजेंद्र माळी, पोलीस हवालदार दिपक कदम, रिक्की सौंदरमल, पिसाळ, पवार, भिंगावडे, पोलीस शिपाई अयाज शेख,परेश शिगवण, विशाल थोरात, रेवनसिद्ध ढगे, साळुंके आदी पथकाने केली.