मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ ऑगस्ट २०२६
मुंबई, – बोरिवली परिसरात हायब्रिड गांजा विक्रीसाठी आलेल्या एका ३२ वर्षांच्या आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. इमादअली इरफान अहमद अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक किलो हायब्रिड गांजासह एक मोबाईल आणि एक हुंडाई कार असा सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरिवली परिसरात काहीजण हायब्रिड गांजा डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती एमएचबी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त संदीप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर हुंबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, पोलीस निरीक्षक मिलिंद नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप वत्रे, सौताडे, दळवी, पोलीस हवालदार बबलू साळुंखे, पोलीस शिपाई स्वप्नील पवार, रविंद्र दामळे, अजय पवार, सुनिल मसके आणि अभिजीत घाडगे आदी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री उशिरा बोरिवलीतील एक्सर गाव, झाशीची राणी लक्ष्मीबाई गार्डनजवळील एस. के सिसॉर्टसमोर एक हुंडाई वेरना कारमधून इमादअली हा आला होता.
त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे पोलिसांना एक किलो हायब्रिड गांजा सापडला. त्याची किंमत सुमारे वीस लाख रुपये इतकी आहे. या गांजासह मोबाईल आणि कार असा २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. इमादअली हा भायखळा येथील बदलूपुरा, आश्रम म्हणजे, रुम क्रमांक २२३ मध्ये राहत असून सध्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे.
अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला हायब्रिड गांजा कोणी दिला, तिथे तो गांजा कोणाला देण्यासाठी दिला होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.