कोस्टल रोडवर इलेक्ट्रीक केबल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश
चौघांना अटक तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२६
मुंबई, – कोस्टल रोडवर इलेक्ट्रीक केबल चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा ताडदेव पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. इतर चार आरोपींमध्ये हुसैन कादर शेख ऊर्फ चोको, नूरमोहम्मद आमीर खान, अमन बिलाल शेख, जाकर शब्बीर शेख यांचा समावेश असून ते चौघेही मच्छिमार आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१२ ऑगस्टला रात्री उशिरा तीन वाजता कोस्टल रोडच्या एनएससीआ डोमजवळील स्ट्रिट लाईट पोल क्रमांक ७२५ ते ७२८ येथील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मार्गावरील स्ट्रिट लाईटला वापरली जाणारी २ लाख ६२ हजार ५०० रुपयांची ४ कोर, ३५ सक्वेअर मीटर जाडीची तांब्याच्या धातूची केबल काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन पलायन केले होते. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच तुफानकुमार सुदर्शन पंडा यांनी ताडदेव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत ताडदेव पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त जयंत मीना, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीना जगताप, पोलीस निरीक्षक संतोष रासम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तांबे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मराठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार अनंत पाटील, पोलीस शिपाई विठ्ठल गायकवाड, निरज गुप्ता, रणपिसे, दत्तात्रय पाटील, प्रसाद राऊत यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या पथकाने वरळी येथील लोटस, भारतनगर परिसरातून हुसैन शेख, मार्केडेश्वर नगर येथून नूरमोहम्मद खान व अमन शेख, जाकर शेख याला कल्याण येथून अटक केली. या गुन्ह्यांत अन्य एका अल्पवयीन मुलाचा सहभाग उघडकीस आला होता. त्याला नंतर वरळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच इलेक्ट्रीक केबल चोरीची कबुली दिली. गुन्हा दाखल होताच चारही आरोपींना अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या चारही आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.