माझगावचा मोरया मिरवणुकीत अंडा फेंकणारा आरोपी गजाआड
फटाक्याच्या धूरांमुळे त्रास झाल्याने रागात कृत्य केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडा फेंकून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दानिश शेर खान नावाच्या एका २२ वर्षांच्या आरोपी तरुणाला भायखळा पोलिसांनी अटक केली. मिरवणुकीत फटाक्याच्या धूरांमुळे त्रास झाल्याने रागाच्या भरात त्याने सदरचे कृत्य केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दानिशची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
रविवारी २३ ऑगस्टला माझगावच्या मोरया मंडळाच्या श्रींचे आगमन सोहळा होता. या मिरवणुकीत अनेक भाविक सामिल झाले होते. भायखळा येथील माझगाव, कॉन्टिनेन्टल हाईट्स इमारतीजवळ आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने अंडाफेक केले होते. हा प्रकार काही भाविकांच्या लक्षात येताच तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी अंडा फेंकणार्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करुन मिरवणुकीत सामिल झालेल्या भाविकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध २९९, १९६ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त जयंत मिना, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण खरात, सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सचिन आव्हाड, हनुमान सवासे, अशोक नरुटे, एटीसी अधिकारी आणि अन्य पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या ३६ तासांत पापेलिसांनी दानिश शेर खान या संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात दानिश हा ऑनलाईन ऑर्डर घेऊन अंडी घरपोच देण्याचे काम करतो. रविवारी नेहमीप्रमाणे तो तिथेे अंड्याची डिलीव्हरीसाठी आला होता. रामभाऊ भोगले मार्गावरुन इमारतीमध्ये प्रवेश करताना मिरवणुकीदरम्यान वाजविण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुरांमुळे त्याला त्रास झाला होता. त्याचा राग मनात धरुन त्याने सदरचे कृत्य केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.