बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन ७१ लाखांची फसवणुक
स्वतचा प्रकल्प नसताना फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका व्यावसायिकाची त्याच्या लहानपणाच्या मित्राने सुमारे ७१ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जयंतीलाल लालजी गडा, मितेष जयंतीलाल गडा आणि भूमिका जयंतीलाल गडा अशी या तिघांची नावे आहेत. विशेष म्हणजे संबंधित बांधकाम प्रोजेक्ट स्वतचा असल्याची बतावणी करणारा जयंतीलाल हा तिथे कामाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
जितेंद्र केदारनाथ शिंदे हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत घाटकोपरच्या राजावाडी परिसरात राहतात. त्यांचा भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. याच परिसरात गडा कुटुंबिय राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. जयंतीलाल हे त्यांचे चांगले मित्र आहे. २०१७ साली जितेंद्र शिंदे हे ठाण्याला तर गडा हे घाटकोपर माणिकलाल इस्टेट येथे राहण्यासाठी गेले होते. २०१२ साली त्यांच्या दोन्ही मुलांना घाटकोपर येथील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे ते पुन्हा घाटकोपर येथे राहण्यासाठी आले होते. त्यानंतरही ते जयंतीलालच्या संपर्कात होते. यावेळी त्याने त्यांना तो बिल्डर लाईनमध्ये काम करत असल्याचे सांगितले. त्याची एक खाजगी कंपनी असून त्यात त्याच्यासोबत मितेष, भूमिका गडा आणि प्रकाश पटेल असे तीन पार्टनर आहे.
त्याच्या कंपनीचे चेंबूरच्य सोमय्या ग्राऊंड, पेस्तम सागर, रोड क्रमांक सहामध्ये हाफकिंग एम्पायर सहकारी सोसायटीच्या पुर्नविकासाचे काम सुरु असल्याचे सांगून त्यांना तिथे एक फ्लॅट घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना बांधकाम साईटवर आणले होते. यावेळी त्यांना तिथे तीन मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसून आले. जयंतीलाल हा त्यांचा लहानपणीचा मित्र असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या प्रोजेक्टमध्ये एक फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात १ कोटी ११ लाखांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला टप्याटप्याने ७१ लाख ३० हजार रुपयांचे पेमेंट केले होते.
जून २०१३ साली त्याने त्यांना फ्लॅटचे ऍलोटमेंट लेटर दिले होते. त्यात तीन वर्षांत फ्लॅटचा ताबा देण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सात वर्ष उलटूनही त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. याच दरम्यान त्यांना इमारतीच्या बांधकामावरुन वाद सुरु असून याबाबत कोर्टात केस सुरु असल्याची माहिती मिळाली होती. जानेवारी २०२६ साली त्यांना त्यांच्या फ्लॅटची उस्मान इस्माईल परमार आणि नसीमा उस्मान परमार यांना विक्री झाल्याचे समजले होते. हा प्रकार समजताच त्यांनी गडा कुटुंबियांना जाब विचारला होता. यावेळी त्यांनी त्यांना त्यांची रक्कम व्याजासहीत परत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
याबाबत परमार कुटुंबियांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी तो फ्लॅट प्रकाश पटेल यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रकाश पटेल यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांना जयंतीलाल गडा हा त्यांच्याकडे कामाला होता. त्याच्यावर सोसयटीच्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी होती. या प्रकल्पाशी गंडा कुटुंबियांचा काहीही संबंध नसून ते त्यांचे पार्टनर नसल्याचे सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच जितेंद्र शिंदे यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयंतीलाल गडा, मितेश गंडा आणि भूमिका गडा या तिघांविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या ७१ लाख ३० हजाराचा अपहार करुन तक्रारदाराची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.