८० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अथर्व डेव्हलपर्सच्या विकासकाला अटक

ताबा न देता फ्लॅटची परस्पर विक्री केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२६
मुंबई, – सुमारे ८० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अथर्व डेव्हलपर्सचे संचालक आणि विकासक दिपक अंबालाल शहा याला शुक्रवारी दिडोंशी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याल बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुर्नविकास केलेल्या इमारतीमधील फ्लॅटचा ताबा न देता दिपक शहाने फ्लॅटची विक्री करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

६० वर्षाचे वयोवृद्ध व्यावसायिक तक्रारदार सुकेतू मथुरादास मजिठिया हे गावदेवी परिसरात त्यांच्या कुटुंबियासंोबत राहतात. त्यांची सोहाना टेक्सटाईल्स नावाची एक खाजगी कंपनी आहे. त्यांच्या मालकीची मालाड परिसरात एक जमिन होती. या जमिनीवर लक्ष्मीनारायण शॉपिंग संट आणि गौतम निवास नावाच्या दोन इमारती होत्या. या निवासी इमारतीच्या एकमध्ये एकतीस भाडोत्री तर दोन क्रमांकाच्या इमारतीमध्ये सहा भाडोत्री राहत होते. या इमारतीमध्ये त्यांच्या वडिलांच्या मजिठिया इंटरप्रायजेस कंपनीचे दोन रुम होते. २००८ साली गौतम निवास ही इमारत अथर्व डेव्हलपर्सचे संचालक आणि मालक दिपक शहा यांनी पुर्नविकासासाठी घेतली होती. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता.

या करारात इमारतीमधील भाडोत्रींसह त्यांना ३०३ चौ फुटाचा फ्लॅट देण्याचे नमूद करण्यात आले होते. या फ्लॅटची सध्याची किंमत ८० लाख रुपये इतकी आहे. तीस महिन्यांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन सर्व भाडोत्रींना फ्लॅटचा ताबा देण्याचे दिपक शहाने आश्‍वासन दिले होते. यावेळी ६५ प्रति चौरस फुट फ्लॅटधारकांना १६ हजार ६९५ तर ७१.५० प्रति चौरस फुट फ्लॅटधारकांना २१ हजार ६६५ हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुकेतू मजाठिया यांना दिपक शहाने फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्याच्या दोन्ही मोबाईलवर संपर्क साधूनही त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.

एप्रिल २०२५ रोजी ते स्वत अथर्व हाईट्स इमारतीच्या त्यांच्या फ्लॅट क्रमांक १२०२ मध्ये गेले होते. तिथे त्यांना गौतम निवासमध्ये राहणारे महेंद्रभाई वखारिया हे राहत असल्याचे दिसून आले. विचारणा केल्यानंतर त्यांना तो फ्लॅट दिपक शहा याने विक्री केल्याचे सांगितले. याबाबत त्यांच्यात एक करार झाला असून या कराराचे कागदपत्रे दाखविले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दिपक शहाची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना जून २०२५ पर्यंत फ्लॅट किंवा फ्लॅटचे ८० लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र त्यांनी त्यांचे आश्‍वासन पाळले नाही.

कराराप्रमाणे त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे ऐंशी लाख रुपये दिले नव्हते. दिपक शहाकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिपक शहाविरुद्ध जानेवारी २०२६ रोजी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सात महिन्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावलली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page