अंधेरी-वडाळा येथे तरुणासह स्विगी बॉयची चाकूने भोसकून हत्या

पूर्ववैमस्नासह पैसे दिले म्हणून हत्या झाल्याचे तपासात उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२६
मुंबई, – अंधेरी आणि वडाळा येथील दोन वेगवेगळ्या घटनेत एका २५ वर्षांच्या तरुणासह स्विगी बॉयची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सहार आणि वडाळा टी टी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येची नोंद केली असून आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमस्नातून शिवम कनोजिया ऊर्फ गब्बर या २५ वर्षांच्या तरुणाची तर सुरेश यादव या ४३ वर्षांच्या स्विगी बॉयची नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

रोहित जयसिंग नेगी हा अंधेरीतील मरोळ पाईपलाईन, द ग्रेट इंदिरानगर परिसरात राहत असून तो सध्या शिक्षण घेत आहे. या परिसरात शिवम, सौरभ शुक्ला, शिवा शिंगे, शिवांग अग्रारी, सोनू ऊर्फ योगेश साखरे, लाला ऊर्फ इरफान राहत असून ते सर्वजण एकाच वयाचे, लहानपणापासूनचे मित्र आहेत. पाचही आरोपी त्याच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. एक वर्षांपूर्वी अभिषेक शुक्लाशी त्यांचे क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्यांच्यात हाणामारी झाली होती, त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून त्यांच्यातील वाद विकोपास गेला होता.

३० ऑगस्टला रोहितसह शिवम व इतर मित्र जेवणानंतर फेरफटका मारण्यासाठी एकत्र जमले होते. याच दरम्यान तिथे पाचही आरोपी आले. एकमेकांना पाहून त्यांनी शिवीगाळ केली होती. जुन्या वादातून या टोळीने त्यांना बांबूसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. याच दरम्यान त्यांनी शिवमला चाकूने भोसकले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याल तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

दुसरी घटना रविवारी रात्री उशिरा वडाळा येथील जय भवानी माता मंदिराजवळ घडली. सुरेश यादव हा स्विगीमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी रात्री तो पार्सल घेऊन तिथे आला होता. यावेळी तिन्ही आरोपींनी त्याच्याकडे नशा करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. त्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोघांनी त्याचे हातपाय पकडून तिसर्‍या त्याच्याकडील चाकूने त्याच्या पोटात वार केले होते. त्याच्याकडील मोबाईल चोरी करुन ते तिघेही पळून गेले होते. रक्तबंबाळ झालेल्या सुरेश यादवला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली. तपासात तिन्ही आरोपी वडाळा परिसरात राहत असून त्यांना नशा आणि दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यांना नशा करण्यासाठी पैशांची गरज होती, ते पैसे सुरेशने दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी त्याची हत्या केली होती. हत्येच्या याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page