एमडी ड्रग्ज गुन्ह्यांतील तस्करांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अडीच वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन दोन्ही आरोपी दोषी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२६
मुंबई, – एमडी ड्रग्ज गुन्ह्यांतील दोन तस्करांना विशेष सेशन कोर्टाने दहा वर्षांच्या कारावासासह प्रत्येकी एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आकाश अनिल सिंग आणि भवन हयातसिंग अधिकारी अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही ४३ लाखांच्या एमडी ड्रग्जसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. अडीच वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने दोघांनाही दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. झटपट पैशांसाठी ते दोघेही ड्रग्ज तस्करीत सामिल झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते.

जोगेश्‍वरी येथे काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी युनिट दहाच्या अधिकार्‍यांनी जोगेश्‍वरीतील बेहरामबाग परिसरात सापळा लावला होता. २९ मार्च २०२४ रोजी रात्री उशिरा दोन वाजता तिथे आकाश आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. यावेळी पळून जाणार्‍या आकाशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी अकरा लाख रुपयांचा ५० ग्रॅम वजनाचा एमडी जप्त केले. त्याच्या चौकशीत भवनचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने एका इमारतीजवळ आकाशची वाट पाहत असलेल्या भवनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ३२ लाख रुपयांचे १०५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले.

या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १५५ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची किंमत ४३ लाख रुपये इतकी होती. ते दोघेही तिथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले होते. मात्र ड्रग्जची विक्री करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत आकाश हा एका क्लबमध्ये कामाला आहे तर भवन हा ब्रोकरचे काम करतो. झटपट पैशांसाठी या दोघांनी एमडी ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांच्यावर एनडीपीएल कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करणयत आली होती.

या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच त्यांच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपपत्र सादर करण्यात आले होते. गेल्या अडीच वर्षांपासून खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती. ही सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. सोमवारी ३१ ऑगस्टला कोर्टाने दोन्ही आरोपींना एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना दहा वर्षांच्या कारावासासह एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे, मनोज सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, गणेश तोडकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम यादव, सहाय्यक फौजदार अहमद शेख, महिला पोलीस शिपाई खाडे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. आरोपींविरुद्ध उपलब्ध पुराव्याच्या योग्य सादरीकरणामुळे न्यायालयाने दोघांनाही शिक्षा सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page