प्रेमविवाह झालेल्या अल्पवयीन मुलीची तीन महिन्यांत आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ सप्टेंबर २०२६
मुंबई, – तीन महिन्यांपूर्वी घरातून कोणालाही काहीही न सांगता पळून प्रेमविवाह केलेल्या एका अल्पवयीन मुलीने बहिणीच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या पतीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध अपहरणासह मानसिक शोषण करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तीन महिन्यांत प्रेमविवाहाला शेवट मुलीच्या आत्महत्येने झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

२० वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहते. तिचे वडिल, भाऊ आणि बहिण बाजूलाच असलेल्या वर्षानगर येथे राहतात. तिला सतरा वर्ष नऊ महिने वयाची शबाना नावाची (नावात बदल) बहिण असून जून २०२६ रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. त्यांनी तिच्या मिसिंगची तक्रार केली नव्हती. एक महिन्यानंतर तिने तिला कॉल करुन तिने निहाल नावाच्या एका तरुणासोबत लग्न केल्याची माहिती दिली. तिची निहालसोबत सोशल मिडीयावरुन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. याा दोघांना लग्न करायचे होते, त्यामुळे ती घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. पळून गेल्यानंतर सुरतच्या एका मंदिरात त्यांनी वैदिक पद्धतीने लग्न केले होते.

निहाल हा गुजरातच्या सुरत शहरात राहत होता, त्यामुळे लग्नानंतर ती निहान, त्याचे आई-वडिलांसोबत सुरत येथे राहत होती. मात्र लग्नानंतर काही दिवसांत निहालचे आई-वडिल तिला कामावरुन मानसिक त्रास देत होते. तिच्याशी वाद घालून भांडण करत होते. तिला सतत त्यांच्या घरातून निघून जाण्यास सांगत होते. शनिवारी सायंकाळी चार वाजता शबाना ही तिच्या विक्रोळीतील तक्रारदाराच्या घरी आली होती. घरी आल्यानंतर शबानाने ४ सप्टेंबरला ती निहालसोबत सुरतला फिरण्यासाठी गेली होती. सकाळी ते दोघेही घरातून निघाले आणि रात्री उशिरा घरी आले होते. याच कारणावरुन निहालच्या आई-वडिलांनी तिच्याशी वाद घातला होता.

याबाबत तिने निहालकडे तक्रार केली असता त्याने तिला तिच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरुन वागावे लागेल असे सांगून तिला पटत नसल्यास तिच्या घरी जाण्यास सांगितले होते. त्यामुळे ती रागाच्या भरात तक्रारदाराच्या घरी आली होती. रविवारी सकाळी तक्रारदार महिला तिच्या पतीसोबत कामासाठी बाहेर गेली होती. यावेळी शबाना ही एकटीच घरी होती. दुपारी दोन वाजता ते घरी आले असता त्यांना शबानाने घरातच लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तिला खाली उतरवून तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुपारी साडेतीन वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिने शबानाने दिलेली माहिती पोलिसांना सांगून तिच्या आत्महत्येला निहाल व त्याचे आई-वडिलच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या जबानीनंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी शबानाचा मानसिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page