जहाजावर चोरीच्या प्रयत्नात चौघांचा विषारी वायुमुळे गुदमरुन मृत्यू
सातजणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल तर तिघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – गोराईतील मनोरी बंदरावर खडकात अडकलेल्या जल जफजीया नावाच्या विदेशी मालवाहू जहाजावर चोरीच्या प्रयत्नात चौघांचा विषारी वायुमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर त्यांचे तीन सहकारी पळून गेले. याप्रकरणी चारही मृत तरुणासह पळून गेलेल्या तिघांविरुद्ध गोराई पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत नंतर तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या टोळीने यापूर्वीही जहाजावर कॉपर वायरसह ब्रास चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरीसाठी गेले आणि जीव गमाविणार्या चारपैकी तिघांची ओळख पटली तर एकाची ओळख पटली नाही. त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.
५ जुलैला अल-जफजीया नावाचे एक विदेशी मालवाहू जहाज मुसळधार पावसामुळे आणि वादळी हवामानामुळे भरकटले होते, ते जहाज नंतर गोराई येथील मनोरी बंदर येथे समुद्रात खडकात अडकले होते. ही माहिती प्राप्त होताच गोराई पोलिसांनी येलोगेट पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर येलोगेट पोलिसांनी जहाजाची तपासणी केली होती. ते जहाज तेलाशी संबंधित कामासाठी वापरले जात होते. या घटनेनंतर जहाजाचा मालक व इतर कर्मचारी पळून गेले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ते जहाज खडकावर अडकल्याने काही भुरट्या चोरांनी जहाजावरील सामानाची चोरीचा प्रयत्न सुरु केला होता.
२८ सप्टेंबरला एक तरुण गोराई पोलीस ठाण्यात आला होता. त्याने त्याच्यासह सहाजण अल जफजीया जहाजावर चोरीच्या उद्देशाने गेले होते. चारजण आतमध्ये गेले तर तीनजण बाहेर रेकी करत होते. जहाजाच्या आत गेलेल्या चौघांनी कॉपर पाईप चोरीचा प्रयत्न करताना जहाजाच्या एसीला जोडलेला एक पाईप फुटला आणि त्यातून विषारी वायू बाहेर आला होता. तो वायू शरीरात गेल्याने ते चौघेही बेशुद्ध पडले होते. तिथेच त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. हा प्रकार बाहेर रेकी करणार्या इतर तिघांच्या लक्षात येताच ते सर्वजण पळून गेले होते. या तरुणाने दिलेल्या माहितीनंतर गोराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रादेशिक प्रतिसाद केंद्र पथकाला ही माहिती दिली होती. या माहितीनंतर या पथकाने बचाव कार्याला सुरुवात केली. यावेळी जहाजाच्या आतील खोलीत अडकून पडलेल्या चारही तरुणांना बाहेर काढून त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तिथे चौघांनाही मृत घोषित करण्यात आले होते. त्यांचे मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. विषारी वायुमुळे गुरुमरुन या चौघांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी चार स्वतंत्र एडीआरची नोंद केली होती. दरम्यान या घटनेनंतर जहाजावर चोरीसाठी गेलेल्या सातही आरोपींविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या चार सहकार्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला होता. त्यापैकी तिघांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले तर एकाची ओळख पटली नव्हती. त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
प्राथमिक तपासात या टोळीने यापूर्वी दोन ते तीन वेळा जहाजावर चोरीचा प्रयत्न केला होता. त्यांनी ४० किलो कॉपर वायर आणि १० किलो ब्रास असा ३८ हजाराच्या मुद्देमालाची चोरी केल्याची कबुली दिली आहे. जहाजावर जाण्यासाठी त्यांनी स्पीड बोटीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.