मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सुमारे ८४ लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह एका ४० वर्षांच्या आरोपीस घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. मरिअप्पा पेरिआनंद देवेंद्र असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी २ किलो ४५१ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, पंकज पाटील, पोलीस हवालदार दिप यशवंते, पोलीस शिपाई गर्जे, महिला पोलीस शिपाई मुलानी, विशेष, पोलीस हवालदार वाडिले आदी पथक चेंबूर परिसरात गस्त घालत होते. मानखुर्द-घाटकोपर लिंक रोड, छेडानगर, वीर माता जिजामाता भोसले मार्गावरील पीडब्ल्यू मैदान बसस्टॉपजवळ गस्त घालताना पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला.
त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडील सामानाची पोलिसांनी झडती घेतली होती. त्यात पोलिसांना २ किलो ४५१ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे ८४ लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर गुरुवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला तो गांजा कोणी दिला, तो कोणाला देण्यासाठी तिथे आला होता, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
२१ कोटीच्या केटामाईनसह प्रवाशाला विमानतळावर अटक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केटामाईन तस्करीचा प्रयत्न हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी हाणून पाडला. याप्रकरणी विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली असून त्याच्याकडून या अधिकार्यांनी सात किलो केटामाईन जप्त केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २१ कोटी रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी आरोपी प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर फुकेत येथे जाण्यासाठी आला होता. त्याच्या बॅगेत केटामाईन असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला हवाई गुप्तचर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना सात किलो केटामाईन सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे २१ कोटी रुपये आहे. हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर आरोपी प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला ते केटामाईन कोणी दिले, फुकेतला तो केटामाईन घेऊन जाणार होता, तिथे तो केटामाईन कोणाला देणार होता याचा तपास सुरु आहे.
