दम मारो दमचा व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करुन दागिन्यांवर डल्ला
साडेआठ लाखांच्या दागिन्यांच्या रॉबरीप्रकरणी चारजणांच्या टोळीस अटक साडेआठ लाखांच्या दागिन्यांच्या रॉबरीप्रकरणी चारजणांच्या टोळीस अटक
अरुण सावरटकर
४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मित्राचा दम मारो दमचा व्हिडीओ काढून ते व्हिडीओ पालकांना दाखविण्याची तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करुन त्याच्याच मित्राने त्याला स्वतच्या घरी रॉबरी करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. त्याच्याकडून घेतलेल्या साडेआठ लाखांचे सोन्याचे विक्री करुन आपसांत पैसे वाटून घेतले. याप्रकणी रॉबरीचा गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी मित्रांसह दागिने विकत घेणारा आरोपी अशा चारजणांच्या टोळीला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. अनुग्रह लोहट, हर्षित सतीश चेतिवाल, रौनक चावला आणि शिबू पाल अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
४८ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील भारतनगरात राहते. कांदिवली येथे ती हाऊसकिपिंगचे तर तिचे पती चालक म्हणून काम करतात. तिला चौदा वर्षांचा मुलगा असून तो सध्या एका खाजगी शाळेत दहावीत शिकतो. २२ सप्टेंबरला ती घरी साफसफाई करत होती. यावेळी तिने कपाटातील सोन्याचे दागिने पाहिले असता तिला बॉक्समधील काही सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने तिच्या चौदा वर्षांच्या मुलाकडे विचारणा केली. सुरुवातीला त्याने काहीही सांगण्यास नकार दिला, मात्र विश्वासात घेतल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितल्याने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्याचा अनुग्रह हा मित्र असून तोदेखील तिथेच राहतो.
एक महिन्यापूर्वी त्याने त्याला तिच्या मुलाचा सिगारेट पिताना एक व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ त्याच्या घरी दाखविणयची धमकी देत त्याने त्याला ब्लॅकमेल करुन बदनामीची धमकी दिली होती. व्हिडीओ घरी दाखविण्याची तसेच बदनामी न करण्यासाठी तो त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे नसतील तरी घरातील सोन्याचे दागिने आणून दे असे सांगत होता. बदनामीच्या भीतीने त्याने ऑगस्ट २०२६ पासून त्याला घरातील एक-एक सोन्याचे दागिने चोरी करुन अनुग्रहला दिले होते. त्यापैकी सोन्याचा झुमका बोगस असल्याचे सांगून त्याने त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन घरातील सर्व सर्व दागिने आणून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने त्याला साडेआठ लाखांचे १२१ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने दिले होते.
मुलाकडून ही माहिती समजताच तिने अनुग्रहची चौकशी केली होती. यावेळी त्याने ते सर्व दागिने त्याचे मित्र हर्षित चेतीवाल व रौनक चावला या दोघांना विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. या दोघांनी नंतर खैरवाडी येथे दागिन्यांची विक्री केली होती. त्यातून आलेले पैसे आपसांत वाटून घेतले होते. त्यातील काही रक्कम त्यांनी तिच्या मुलालाही दिली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने या तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच अनुग्रह लोहट, हर्षित चेतिवाल, रौनक चावला आणि दागिने विकत घेणारा शिबू पाल अशा चौघांना अटक केली. चौकशीत त्यांचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. अटकेनंतर चारही आरोपींना वांद्रे येलि लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील सर्व सोन्याचे दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.