मास्टर कीच्या मदतीने बाईक चोरी करणारा डिलीव्हरी बॉय गजाआड

अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चोरी केलेले अकरा बाईक जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पार्क केलेल्या बाईक मास्टर कीच्या मदतीने चोरी करणार्‍या एका टोळीचा कुरार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका रेकॉर्डरील सराईत गुन्हेगार असलेल्या डिलीव्हरी बॉयसह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अमीत दिलीप सोनी असे डिलीव्हरी बॉयचे नाव असून या दोघांनी मुंबईसह ठाणे ग्रामीण परिसरात चोरी केलेल्या अकरा चोरीच्या बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अकरापैकी पाच बाईकच्या मालकांचा शोध लागला असून उर्वरित सहा बाईक मालकांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांत बाईक चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा बाईक चोरांविरुद्ध स्थानिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच ३ ऑक्टोंबरला मालाडच्या हद्दीतून एक बाईक चोरीस गेली होती. हा प्रकार दुसर्‍या दिवशी उघडकीस येताच तक्रारदाराने कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक भारत दराडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, पोलीस हवालदार अविनाश गुजर, पोलीस शिपाई बबन राठोड, संतोष फडतरे, श्रीकांत गोरे या पथकाने अमीत सोनी याच्यासह एका अल्पवयीन मुलाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांनीच ही बाईक चोरी केल्याची कबुली दिली. ते दोघेही मास्टर कीच्या मदतीने रस्त्यावर पार्क केलेल्या बाईक चोरी करत होते. तपासात त्यांनी मुंबईतील कुरार मेघवाडी, ठाणे ग्रामीणच्या अचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या अकरा बाईक जप्त केल्या आहेत.

यातील तीन बाईक कुरार आणि प्रत्येकी एक बाईक मेघवाडी, अचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेली होती. इतर सहा बाईकच्या मालकांचा शोध सुरु आहे. अमीत हा मालाडच्या कुरारगाव, भीमनगर, महात्मा फुले चाळीत राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्यांच्या अटकेने अकरा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page