स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवरुन चढून घरफोडी करणार्या त्रिकुटास अटक
दहा गुन्ह्यांची उकल; घरफोडीसाठी चोरीच्या बाईकचा वापर
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ जुलै २०२४
मुंबई, – उच्चभू इमारतीच्या पाईपवरुन स्पायडरमॅनप्रमाणे चढून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन घरफोडी करणार्या एका टोळीचा कांदिवली पोलिीसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अटकेने वाहनचोरीसह घरफोडीच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील सुमारे पाच लाखांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संतोष सुरेश चौधरी ऊर्फ वैतू, देव रामप्रसाद बनिया आणि रजब नजीर खान अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. घरफोडीसाठी ही टोळी चोरीच्या बाईकचा वापर करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
११ जूनला कांदिवलीतील एस. व्ही रोड, नमन टॉवर इमारतीमध्ये घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार उघडकीस येताच कांदिवली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला होता. गेल्या काही दिवसांत उत्तर मुंबईत रात्रीच्या वेळेस वाहन चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या गुन्ह्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशांतर सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, पोलीस हवालदार जगदाळे, गावकर, तावडे, पोलीस शिपाई घोडके, केसरकर, राणे यांनी या आरोपींचा शोध सुरु केला होता.
जवळपास शंभरहून अधिक सीसीटिव्ही फुटेज पाहणी करुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान या गुन्ह्यांतील काही आरोपी नालासोपारा येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकाने नालासोपारा येथे साध्या वेशात पाळत ठेवून संतोष चौधरी आणि देव बनिया या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर रजब खानला पोलिसांनी जोगेश्वरी येथून ताब्यात घेतले. चौकशीत ते तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांनी या घरफोडीसह इतर दहा बाईक चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात कांदिवली पोलीस ठाण्यातील तीन, मालाड व बोरिवली पोलीस ठाण्याच्या दोन, एमएचबी, वनराई आणि गोरेगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्हयांतील ८१ हजार ५०० रुपयांची कॅश, सहा मोबाईल, सोन्या-चांदीचे इमिटेशन ज्वेलरी, घड्याळ, दोन चोरीचे बाईक असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दिवसा रेकी केल्यानंतर ते तिघेही रात्री उशिरा किंवा पहाटे चोरी करायचे. संतोष हा इमारतीच्या पाईपवरुन स्पायडरमॅनसारखा चढून फ्लॅटमध्ये प्रवेश करायचा आणि कपाटातील सर्व मुद्देमाल माल चोर करत होता. यावेळी इतर दोघेही खाली उभे रेकी करत होते. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांचा ताबा लवकरच इतर पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.