विक्री केलेल्या भूखंडाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक
मालाड येथील घटना; पती-पत्नीसह प्रॉपटी ब्रोकरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जुलै २०२४
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरातील एका भूखंडाचा खाजगी कंपनीला विक्री केली असताना या भूखंडाची पुन्हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका व्यावसायिकाची दोन कोटी एकतीस लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती-पत्नीसह प्रॉपटी ब्रोकरविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या आरोपींमध्ये मेहंदी रजा नखवी, त्याची पत्नी सायना मेहंदी नखवी आणि प्रॉपटी ब्रोकर नारायण पांड्ये यांचा समावेश असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
अजश हर्षकुमार वसु हे व्यावसायिक असून त्यांचा जाहिरातीचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत खार परिसरात राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रॉपटी ब्रोकर नारायण पांड्ये याच्याशी ओळख झाली होती. त्याने त्यांना मालाडच्या मालवणीतील एरंगळ गावात एक मोकळा भूखंड असून त्यात त्यांना गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. ही जागा मेहंदी आणि सायना नखवी यांच्या मालकीची होती. जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी तो भूखंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात भूखंडाचा दोन कोटी एकतीस लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२४ रोजी अजश वसु यांनी टप्याटप्याने नखवी पती-पत्नींना संपूर्ण पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यात भूखंडाच्या खरेदी-विक्रीचा करार होऊन कन्व्हेन्स डिड झाला होता.
याच दरम्यान त्यांना हा भूखंड नखवी यांनी नारायण पांड्येच्या मदतीने एका खाजगी कंपनीला विक्री केली होती. हा भूखंड तारण ठेवून त्यावर कर्ज घेण्यात आले होते. हा संपूर्ण व्यवहार मेहंदी, सायना आणि नारायण यांना माहित होता. विक्री केलेल्या भूखंडाचा पुन्हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन या तिघांनी अजय वसु यांची फसवणुक केली होती. भूखंडासाठी घेतलेल्या २.३१ कोटीचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या तिघांविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मेहंदी नखवी, सायना नखवी आणि नारायण पांड्ये या तिघांविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.